पुलाचे काम संथगतीने
परभणी : येथील रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाचे काम संथगतीने सुरू आहे. मागील दोन वर्षांपासून हे काम केले जात आहे. अद्यापही ते पूर्ण झालेले नाही. सध्या रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची संख्या मर्यादित स्वरुपाची असून, पादचारी पुलाचे काम त्वरित पूर्ण करुन घ्यावे, अशी मागणी होत आहे.
महागाई वाढली
परभणी : पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने त्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला आहे. परजिल्ह्यातून आवक होणाऱ्या वस्तूंचे भाव वाढल्याने त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. भाजीपाला, धान्य, खाद्यपदार्थांचे भाव वाढले असून, महागाईचा भडका उडाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
हातपंपांची दुरवस्था
परभणी : शहरासह ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी ठिकठिकाणी सार्वजनिक हातपंप घेण्यात आले होते. मात्र, या हातपंपाचे साहित्य गायब झाले आहे. परिणामी हातपंप बंद अवस्थेत आहेत. उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, या हातपंपांची दुरुस्ती केल्यास टंचाई शिथील होण्यास मदत होऊ शकते.
प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था
परभणी : एस. टी. महामंडळाने शहरात उभारलेल्या प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. वसमत रस्त्यावरील प्रवासी निवाऱ्यांच्या ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. काही ठिकाणी आसनांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. महामंडळाने याकडे लक्ष देऊन प्रवासी निवारे प्रवाशांच्या सोयीनुसार वापरण्यायोग्य करावेत, अशी मागणी होत आहे.