परभणी : कोरोनाच्या संकटाचा सामना करीत असताना जिल्ह्यात आता रक्ताच्या टंचाईचा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा रक्तपेढीत दोन दिवस पुरेल एवढा साठा शिल्लक आहे. भविष्यात लसीकरण वाढल्यानंतर ही समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे. त्याचबरोबर मागच्या काही दिवसांपासून रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने येथील जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीला रक्ताच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्हा रुग्णालयात २ हजार बॅग रक्ताची साठवणूक करण्याची क्षमता असलेली रक्तपेढी उभारण्यात आली आहे. प्रत्येक महिन्याला या रक्तपेढीला किमान ६०० बॅग रक्ताची आवश्यकता भासते. मात्र, प्रत्यक्षात सध्या रक्तपेढीमध्ये केवळ ६४ बॅग रक्तसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात दररोज ३० बॅग रक्ताची गरज लागते. त्यामुळे उपलब्ध रक्तसाठा केवळ दोन दिवस पुरेल एवढाच आहे.
लसीकरण वाढल्यास आणखी गंभीर स्थिती
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लसीकरण मोहिमेवर भर दिला जात आहे. १ मेपासून अठरा वर्षांपुढील सर्व नागरिकांना लसीकरण केले जाणार आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर किमान दोन महिने संबंधित लाभार्थ्याला रक्तदान करता येत नाही. त्यामुळे लसीकरण करणाऱ्यांची संख्या ज्या प्रमाणात वाढेल त्या प्रमाणात जिल्ह्यात रक्ताचा तुटवडाही निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
लसीकरणापूर्वी रक्तदानाचे आवाहन
सध्या निर्माण झालेले कोरोनाचे संकट आणि जिल्ह्याला लागणारी रक्ताची गरज लक्षात घेता प्रत्येकाने लसीकरण करण्यापूर्वी रक्तदान करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा रक्तपेढीच्यावतीने करण्यात आले आहे. कोरोना संसर्गामुळे एकाच वेळी रक्तदान शिबिरे घेणे शक्य नसले तरी प्रत्येकाने लसीकरण करण्यापूर्वी रक्तदान केल्यास रक्ताचा साठा वाढून अनेक रुग्णांना जीवदान देणे शक्य आहे. तेव्हा रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन केले जात आहे.
प्रत्येक महिन्यात लागणारे रक्त
थलेसेमियाग्रस्त रुग्णांना महिन्यातून दोन वेळा रक्त द्यावे लागते. जिल्ह्यात २०० थलेसेमियाग्रस्त रुग्ण आहेत. त्यामुळे या रुग्णांसाठी ४०० बॅग रक्त प्रत्येक महिन्यात राखीव ठेवावे लागते. त्याचप्रमाणे प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांनाही प्रत्येक महिन्यामध्ये दीडशे बॅग रक्त पुरवावे लागते. याशिवाय शस्त्रक्रिया, अपघाती रुग्ण व इतर रुग्णांसाठी रक्ताची गरज भासत आहे. भविष्यात निर्माण होणारी संभाव्य टंचाई लक्षात घेता युवकांनी रक्तदानासाठी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.