परभणी: अंधश्रद्धा निर्मूलनासाठी शासनाने अधिक कडक कायदे करावेत, असा सूर युगंधर फाऊंडेशनच्या बैठकीत उपस्थितांनी काढला.
संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त युगंधर फाऊंडेशनच्या वतीने चिंतन बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित वक्त्यांनी अंधश्रद्धा निमूर्लनासंदर्भात मार्गदर्शन केले. एका महिलेला तिचे पावित्र्य सिद्ध करण्यासाठी जातपंचायतीच्या निर्णयानुसार उखळत्या तेलामध्ये हात घालावा लागला. ही घटना फुले, शाहू,आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी आहे. बुवाबाजी, भोंदूबाबा यांची कारनामे वारंवार उघडकीस येत आहेत. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कडक कायदे करण्याची गरज असल्याचे बैठकीत व्यक्त करण्यात आले.
यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी डॉ. अगस्ती इंगोले, एम. व्ही. भालेराव, समादेशक अधिकारी परमेश्वर जवादे, मा.म.बरे आदींची उपस्थिती होती. फाऊंडेशनचे अध्यक्ष संजीव अढागळे यांनी प्रास्ताविक केले. बैठकीस युगंधर फाऊंडेशनचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.