देवगाव फाटा : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सेलू तालुक्यातील देवगाव फाटा येथील जालना जिल्ह्याच्या हद्दीवर उभारण्यात आलेल्या चेकपोस्टचा नुसताच दिखावा केला जात असल्याची बाब गुरुवारी सकाळी ८.१०च्या सुमारास केलेल्या पाहणीत समोर आली. तपासणीसाठी नियुक्त केलेले कर्मचारी एका जागेवर बसून होते. वाहनांची बिनदिक्कतपणे ये-जा सुरू असल्याचे पाहावयास मिळाले.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवासी आणि खासगी वाहतुकीवर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंध घातले आहेत. परभणी जिल्ह्याला जिंतूर व सेलू तालुक्याच्या परिसरात काही अंतरावर विदर्भाच्या सीमा येतात. सेलू तालुक्यातील देवगाव फाटा येथे जालना जिल्ह्याची सीमा असली तरी त्यानजीकच विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात वाहने मराठवाड्यात प्रवेश करीत असतात. या दृष्टीने देवगाव फाटा येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने चेकपोस्ट २४ फेब्रुवारी रोजी स्थापन करण्यात आले. या दिवशी अधिकाऱ्यांनी फोटोसेशनही केले. परंतु, कडक तपासणीला खो दिल्याची बाब गुरुवारी केलेल्या पाहणीत समोर आली. सकाळी ८.१० वाजता येथील चेकपोस्टला सदरील प्रतिनिधीने भेट दिली असता येथील जि.प. शाळेतील पांडुरंग गणगे, दिगंबर लगड, उद्धव कटारे, गिरीश कुलकर्णी, रामचंद्र मुंडे हे पाच शिक्षक व आरोग्य सेवक व्ही.बी. गलांडे एकत्रित उभे असल्याचे पाहावयास मिळाले. या वेळी त्यांच्यासमोरूनच वाहनांची ये-जा बिनदिक्कतपणे सुरू होती. या वेळी या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली असता, त्यांनी सकाळी ६ वाजता येथे आल्याचे सांगितले. बसण्यासाठी जागा नाही, मास्क, सॅनिटायझरही देण्यात आले नाही. आरटीपीसीआर चाचणीचे साहित्य एका खोलीत कुलूपबंद असल्याचे पाहावयास मिळाले. सकाळी ६ ते ८.१० पर्यंत एकही वाहन तपासले नाही. एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हता. त्यामुळे येथील चेकपोस्टची उभारणी अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, या चेकपोस्टला सकाळी ११.५५ वाजता उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी भेट देऊन पाहणी केली. या वेळी त्यांनी बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचे आदेश दिले. तसेच विदर्भातून बसमधून येणाऱ्या प्रवाशांचीही तपासणी करण्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर १६ प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.
१५ पथकांची नियुक्ती
विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देत असलेल्या शिक्षकांना कोरोना तपासणी पथकात घेण्यात येऊ नये, असे शासनाचे आदेश असतानाही तालुका प्रशासनाने ३१ मार्चपर्यंत जिल्हा परिषदेतील ७५ शिक्षकांची येथे नियुक्ती केली आहे. त्यांची ५ पथके स्थापन करण्यात आली असून, सकाळी ६ ते दुपारी २, दुपारी २ ते रात्री १० व रात्री १० ते सकाळी ६ अशा तीन पाळ्यांमध्ये शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.