जिल्ह्यातील पशू संवर्धन दवाखाने उघडण्याची वेळ जि.प.च्या वतीने बदलण्यात आली आहे. पूर्वी सकाळी ९ ते १ व दुपारी ४ ते ६ असा दोन टप्प्या दवाखाना उघडा राहत होता. आता ही वेळ बदलून एकाच टप्प्यात सकाळी ९ ते दुपारी ४ अशी वेळ करण्यात आली आहे. नवीन वेळेत पशू संवर्धन दवाखाना उघडत नसल्याच्या तक्रारी पशूपालकांनी जिप..च्या पशू संवर्धन सभापती मीराताई दादासाहेब टेंगसे यांच्याकडे केल्या होत्या.
त्यानुसार त्यांनी शुक्रवारी दुपारी १ वाजता पाथरीहून पाेखर्णी रस्त्याने परभणीकडे जात असताना केकरजवळा येथील पशूसंवर्धन दवाखान्यास भेट दिली. यावेळी हा दवाखाना बंद होता. येथील पशू संवर्धक पर्यवेक्षक आणि शिपाई दोघेही गायब होते.
या संदर्भात बोलताना सभापती टेंगसे यांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर टेंगसे यांनी पोखर्णी येथील दवाखान्यास दुपारी २ वाजता भेट दिली. यावेळी येथे ३ कर्मचारी कार्यरत असल्याचे आढळून आले.