चंद्रमुनी बलखंडे ल्ल /परभणीअनुसूचित जातीतील दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबासाठी राबविण्यात येत असलेल्या रमाई घरकुल योजनेसाठी जिल्ह्यातील लाभार्थ्यांना शासनाकडून ८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. परंतु, प्रतीक्षा यादीत एकही लाभार्थी शिल्लक नसल्याने पंचायत समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांना शोध सुरु केला आहे. दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबासाठी शासनाकडून इंदिरा आवास योजना व रमाई घरकुल योजना राबविण्यात येत आहे. इंदिरा आवास योजनेसाठी लाभार्थ्यांची झुंबड उडत असताना रमाई योजनेसाठी जिल्ह्यात पात्र लाभार्थी मिळत नसल्याने प्रशासनाने शोध मोहीम सुरु केली आहे. जिल्ह्यात सन २0१0-११ मध्ये १ हजार २७१, २0११-१२ मध्ये ७ हजार ७१८, २0१२-१३मध्ये १ हजार ५९0 असे एकूण १0 हजार ५७९ लाभार्थ्यांनी या योजनेच्या घरकुलाचा लाभ घेतला. मात्र सन २0१३-१४पासून अनुसूचित जातीची प्रतीक्षा यादीच संपलेली आहे. याच योजनेसाठी शासनाने ८00 घरकुलांसाठी ८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. मात्र जिल्ह्यात पात्र कुटुंबाचे लाभार्थी नसल्याने दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबाचा शोध सुरु केला आहे. यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत आवाहनही करण्यात आले आहे. पंचायत समिती मार्फत गाव पातळीवर लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना लाभ देण्याची मोहीम सुरु केली आहे. मागील एक महिन्यापासून निधी पडून असताना अद्याप लाभार्थी मिळत नसल्याने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाही हतबल झाली आहे. /
नावे मागविली> रमाई योजनेसाठी जिल्ह्याला ८ कोटी रुपये मिळाले. सध्या कार्यालयाकडे ५00 च्यावर लाभार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. त्यांची निवडही केली आहे. आता उर्वरित लाभार्थ्यांची यादी ३१ जानेवारीपर्यंत मागविलेली आहे. त्यांचा गटविकास अधिकार्यांमार्फत शोध सुरु असल्याचे सांगण्यात आले. साहित्याची प्रतीक्षा
> रमाई घरकुल योजनेअंतर्गत यापूर्वी १0 हजार ५७९ लाभार्थ्यांना घरकुले मिळाली. या लाभार्थ्यांना समाजकल्याण विभागाकडून चादर, सतरंजी व सोलार दिवा असे साहित्य दिले जाते. मात्र मागील एक वर्षापासून लाभार्थ्यांना हे साहित्यच मिळाले नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
सर्व लाभार्थ्यांना लाभ - कदम> रमाई घरकुल योजनेपासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही. याची प्रशासनाकडून पुरेपूर खबरदारी घेतली जात आहे. प्रशासनाकडे असलेल्या माहितीनुसार सर्व लाभार्थ्यांना याचा लाभ दिला आहे. यापुढेही काही पात्र लाभार्थी असतील तर त्यांनी त्यांची नावे संबंधित पंचायत समित्यांकडे नोंदवावीत. पात्र लाभार्थ्यांची निवड करुन त्यांनाही योजनेचा लाभ दिला जाईल, अशी प्रतिक्रिया प्रकल्प संचालक बी. टी. कदम यांनी दिली.
■ जिल्ह्यात अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्याक, सर्वसाधारण असे ८0 हजार २0 कुटुंब आहेत. यामध्ये अनुसूचित जाती-जमाती १५ हजार ९९0, अल्पसंख्याक ३हजार ६६६ कुटुंबांनी घरकुल योजनेचा लाभ घेतल्याने प्रतीक्षा यादी संपलेली आहे. रमाई घरकुल योजनेअंतर्गत पंचायत समितीमार्फत ५00 च्यावर लाभार्थ्यांची निवड केलेली आहे. आता ३00लाभार्थ्यांचा शोध घ्यावा लागणार आहे.