शहरात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर हॉटेल्स तसेच रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्रीच्या हातगाड्यांना निर्बंधात सूट दिलेल्या वेळेपर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. यासह रात्री दहा वाजेपर्यंत हॉटेल्समधून पार्सल सुविधा सुरू आहे. मागील अनेक महिन्यांपासून बाहेरचे खाणे टाळलेल्या खवय्यांना पावसाळी वातावरणाने हाॅटेल्समधील खाद्यपदार्थ खावे वाटत आहेत. त्यामुळे अनेकजण हाॅटेल्समधील खाद्यपदार्थांवर ताव मारत आहेत. पावसाळ्यात पचनशक्ती मंद होते. यामुळे बाहेरील तसेच जड अन्न खाल्ल्यास त्यातून अपचन, पित्त वाढण्याचा धोका असतो. यातून पोटाचे विकार जडू शकतात. यामुळे या काळात बाहेरील खाद्यपदार्थ खाताना काळजी घेतलेली बरी, असे डाॅक्टरांचे मत आहे.
रस्त्यावरचे अन्न नकोच
शहरात फास्टफूड, भेळ, पाणीपुरी, पोहे, मिसळ, उडपी पदार्थ यांसारखे खाद्यपदार्थ विक्री करणारे अनेक हातगाडे जागोजागी उभे राहतात. यातील अनेक ठिकाणांवर स्वच्छता नसते. तसेच काही ठिकाणी परिसरात नाली, अस्वच्छ पाणी, फिरती जनावरे यांचा वावर असतोे. तसेच प्लेटची स्वच्छता आणि बसण्यास असलेली जागा, पिण्याचे पाणी याकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे चमचमीत वाटणारे रस्त्यावरील अन्नपदार्थ खाताना प्रत्येकाने आपल्या तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे. या ठिकाणी उघड्या खाद्यपदार्थांवर किटक बसण्याचा धोका असतो.
पावसाळ्यात हे खायला हवे
- शक्यतो ताजे अन्न व शिजवलेले गरम अन्न
- कमी तिखट, कमी तेलकट, कमी मसाला वापरलेले पदार्थ
- जास्तीत जास्त फळांचे सेवण करावे
- बाहेरील खाद्यपदार्थ शक्यतो नकोच
पावसाळ्यात हे खाणे टाळावे
- अंबवलेले पदार्थ
- हिरवी मिरची
- फास्टफूड
- आंबट, तिखट पदार्थ.
- काळा मसाला, लाल मसाला
- शिळे अन्न खाऊ नये
आहारतज्ज्ञ काय म्हणतात ?
पावसाळ्यात पित्तप्रकोपात वाढ होते. यामुळे पचनशक्ती मंद होते. जेव्हा भूक असेल तेव्हा आवश्यक तेवढेच जेवण करावे. उघडे अन्नपदार्थ खाऊ नयेत. शिळे अन्नपदार्थ खाणे टाळले पाहिजे. उघडे अन्न पदार्थ खाल्ल्याने त्रास होऊ शकतो. यामुळे हाॅटेलमधील तसेच बाहेरील खाद्यपदार्थ खाताना काळजी घ्यावी. - डाॅ. प्रशांत धमगुंडे, आहारतज्ज्ञ.