नांदेड : दिवाळसण सुरू झाला आहे. त्यामुळे खरेदीची लगबग सर्वत्र दिसत असून बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी बहुतेकांची धावपळ सुरू आहे; पण शहरातील बहुतांश एटीएम नेमक्या याच वेळेवर सोमवारपासून बंद असल्याचे दिसत असून ग्राहक त्रस्त झाले आहेत.
अनेकांना नाईलाजाने शाखेत जावून रांगेत उभे राहून पैसे काढावे लागत आहे. बँक कर्मचारीही वैतागले आहेत. आजघडीला नागरिक आपले व्यवहार बँकेमार्फत करीत असतात. रोख रक्कम सहसा जवळ नसतेच. गरज असेल तेव्हा एटीएममधून पैसे काढले जातात. गावागावात एटीएमची सेवा बँकांमार्फत केल्याने व्यवहारातही सहजता आली आहे. पण वर्षभर साथ देत असलेले एटीएम नेमके दिवाळसणाच्या मुहूर्तावर बेइमान होत असल्याचे पहावयास मिळते.
कुठल्या एकाच बँकेचे एटीएम बंद आहे असे नसून सोमवारपासून थोड्याफार फरकाने सर्वच एटीएम बंद सुरू होत आहेत. मोठय़ा आशेने पैसे काढण्यासाठी गेलेले नागरिक या कारणाने आल्यापावली माघारी फिरतात. काहीच वेळापुरते सुरू झालेले एटीएम पुन्हा थोड्या वेळात बंद पडते. बंद पडल्यावर तत्काळ संबंधितांना कळविणे अपेक्षित असताना दरवाजा बंदचा बोर्ड लावण्यात धन्यता मानली जाते. नेमके कारण काय याचा पत्ताच नाही. एटीएमच्या दरवाजावर एटीएम बंद आहे, असे फलक अडकविल्याचे दिसत आहे. त्यामुळे ग्राहकांना आल्यापावली परत फिरावे लागत आहे. लिंक नसल्याचे कारण काहीद्वारे सांगितले जाते तर बँक लिंक असल्याचे सांगतात. तसेच कॅश सोडून बाकी सर्व सुविधा सुरू आहे.
दिवाळीमुळे सर्वांचीच खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. रोख रक्कम जवळ न बाळगता शहरात खरेदीला जाताना तेथीलच एटीएममधून पैसे काढून खरेदी करण्याचा विचार सर्वजण करीत असतात. पण शहरात आल्यावर त्यांना बंद एटीएमचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरात सोमवारपासून बंद एटीएमची समस्या भेडसावत आहे. बँकेतील कर्मचारीवर्गाला याबाबत विचारले असता बँकेत लिंक फेलचा प्रॉब्लेम नाही. त्यामुळे तुम्ही एटीएमवरील नंबरवर फोन करून विचारा असे सांगितले जाते. तसेच स्वत: काही न सांगता तुम्ही खाली बसलेल्या गार्डला विचारा अशी उत्तरेही दिली जातात. त्यामुळे काय करावे? असा प्रश्न ग्राहकांना आता पडू लागला आहे. शहरातील बहुतेक एटीएम दोन दिवसांपासून सतत बंदावस्थेत आहेत. एक-दोन तासांसाठी सुरू होवून लगेचच ते पुन्हा बंद पडते. याचा सरळ परिणाम ग्राहकांना भोगावा लागत आहे. त्यांचे व्यवहार ठप्प झाले आहे. बँका कितीही कारण सांगत असल्या तरी कॅश नसल्यानेच असे प्रकार सणाच्या मुहूर्तावर घडत असल्याचे नागरिकांमधून सतत बोलल्या जात आहे. सेवा सुरळीत करावी, अशी मागणी वारंवार केली जात आहे. /(प्रतिनिधी) ■ एटीएम बंद आहे हा प्रकार ग्राहकांसाठी दिवाळीत नित्याचाच झाला आहे. त्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. कुठल्याही बँकेच्या एटीएममधून पाच वेळा पैसे काढता येतात. सहाव्या वेळी पैसे काढताना काही रक्कम वजा होते. या कारणाने शक्य होईल तेव्हा ग्राहक आपल्याच खात्याच्या एटीएममधून पैसे काढण्यावर भर देतात. दिवाळीच्या वेळी एमटीएम बंद असल्याने पाच वेळा ट्रान्झेक्शन होवूनही अनेकांना सहाव्या वेळी पैसे काढावे लागतात. परिणामी आगाऊ पैसे वजा होत असल्याने भूर्दंड सोसावा लागतो.