यावर्षी सरासरीएवढा पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. या अंदाजानुसार जून महिन्याच्या पहिला टप्पा समाधानकारक पाऊस झाला. त्यानंतर १५ ते २० दिवस पावसाने खंड दिला होता. मात्र दोन आठवड्यांपूर्वी पावसाचे पुनरागमन झाले असून अनेक भागात अतिवृष्टीची नोंद झाली आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २५१ मिलीमीटर पाऊस होणे अपेक्षित होते. त्यातुलनेत ४५२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अपेक्षित पावसाच्या तुलनेत १७९ टक्के पाऊस झाला. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७७९ मिलीमीटर आहे. सरासरीच्या निम्मा पाऊस दीड महिन्यातच झाला आहे.
पूर्णा तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक ४९८ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्याचप्रमाणे परभणी तालुक्यात ४८७, सोनपेठ तालुक्यात ४८२, पाथरी ४७४, पालम ४६०, सेलू ४३०, जिंतूर ४२३, मानवत ४२० आणि गंगाखेड तालुक्यात ३८५ मि.मी. पाऊस झाला आहे. अपेक्षित पावसाच्या टक्केवारीचा विचार करता सोनपेठ तालुक्यात २२१ टक्के पाऊस झाला. तर पूर्णा तालुक्यात २१६ टक्के आणि पाथरी तालुक्यात २०० टक्के पाऊस झाला आहे.