पाथरी : दुष्काळी परिस्थितीने कोलमडून पडलेल्या शेतकर्यांसाठी शासनाने जाहीर केलेला मदत निधी पाथरी तालुक्यातील बॅकात जमा झाला आहे. ताुक्यातील १६ गावातील ४ हजार ६१९ शेतकर्यांना २ कोटी ४६ लाख १२ हजार १५ रुपये अनुदान लवकरच वाटप होणार आहेत. खरीप हंगामामध्ये पाऊसाने मारलेल्या दडीने या भागातील शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. रबी हंगामात शेतकर्यांना पेरणी करता आली नाही. त्यामुळे यंदा शेतकर्याच्या हाती काहीच पडले नाही. पर्यायाने शेतकरी यावर्षी पूर्णत: आर्थिक अडचणीत सापडला . राज्य शासनाच्या पथकाने प्रत्यक्ष शेतीत जाऊन पीक पाहणी केली. त्यात या तालुक्यात ३७ रुपये पैसेवारी काढण्यात आली होती. पाथरी तालुक्यात ३७ हजार ३३७ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले. तालुक्यासाठी पहिल्या टप्प्यात ७ कोटी ५0 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले. महसूल प्रशासनाने गावनिहाय शेतकर्यांच्या जिरायती, बागायती आणि फळबाग पिकांच्या याद्या तयार केल्या. शेतकर्यांचे बँक खाते क्रमांकासह या याद्या टप्प्या टप्प्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये दाखल करण्यास सुरूवात केली आहे. पहिल्या टप्प्यातील पाच गावातील १२५९ शेतकर्यांना ६२ लाख रुपये अनुदान २२ जानेवारी रोजी वितरित करण्यात आले होते. आता २७ जानेवारी रोजी १६ गावातील ४ हजार ६१९ शेतकर्यांना अर्थसहाय्य वाटप करण्याचे आदेश तहसीलदार देविदास गाडे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेला दिले आहेत. शेतकर्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम तातडीने जमा करण्याच्या सूचना दिल्या. /(वार्ताहर)
■ पाथरी तालुक्यातील शेतकर्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा झाले आहे, अशी माहिती तहसीलदार देवीदास गाडे यांनी दिली.> बागायती शेतकर्यांना हेक्टरी ९ हजार रुपये व कोरडवाहूसाठी ४ हजार ५00 रुपये अनुदान जाहीर करण्यात आले.
> राज्य शासनाने तुटपुंजे अनुदान शेतकर्यांच्या बँक खात्यावर जमा केले आहे. उर्वरित अनुदान केव्हा येणार असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.