असा प्रश्न येतोच ना आपल्या मनात, की जगात इतर लोक कसे भराभर यशस्वी होतात, चटचट पुढे सरकतात आणि आपलं घोडं आहे तिथंच पेंड खातं, असं का होतं?
शोधायला गेलं तर इतरांना, परिस्थितीला, नशिबाला बराच दोष देता येईल. पण त्यातून आपला प्रश्न सुटणार नाही.
तो सुटायचा तर आपल्याच काही चुका दिलखुलासपणो मान्य करून त्या दुरुस्त करण्याची हिंमत करावी लागेल आणि सातत्यानं करावी लागेल!
बोलायला सोपं वाटतं, पण आपलं काही चुकतं हेच मुळात आपल्याला मान्य नसतं. खूप जड जातं असं काही कबूल करून त्यावर अंमलबजावणी करणं!
हा पहिला टप्पा ओलांडता आला तर मात्र आपल्या चुकांवर काही काम करणं शक्य होईल!
त्या चुका कुठल्या?
1) नाहीच जमलं तर?
ही आपल्या मनातली पहिली शंका. काहीही करायचं मनात येवो, ते बेधडक करून टाकण्यापेक्षा आपण त्याचा खलच जास्त करत बसतो. अति विचार. धोका टाळण्याचाच विचार. तो करकरून मग आपली खात्रीच होते की, हे आपल्याला जमणारच नाही. खरंतर आपण एकप्रकारे आपली गुणवत्ता, कौशल्य यांच्यावर अन्याय करून आलेली संधी नाकारत असतो. आपली प्रगती होत नाही कारण आपण आहे ते जरा बाजूला ठेवून, नवीन, न केलेलं असं कधी काही करतच नाही. आणि सतत भीत भीत म्हणतो की लोक काय म्हणतील! ट्रकवर वाचलेली पाटी आठवायची अशावेळी- सबसे बुरा रोग, क्या कहेंगे लोग?
2) डाऊट आहे!
संशय खातो आपण, स्वत:वर! हा आपला दुसरा दुगरुण. का कोण जाणो, आपल्या आतून एक आवाज आपल्याला सांगतो, नाहीच जमणार! नको भानगडीत पडूस! कच खातो आपण आणि तिथंच संपत जातो, आपलं नवीन काहीही करण्याचा आत्मविश्वास!
3) चुकीच्या वायफळ सवयी
आपल्या लेखी इतरांना चांगल्या सवयी असतात, पण आपण त्या कधी अंगीकारत नाही. खरं सांगायचं तर चांगल्या सवयीच यशाचा पाया घालतात. आणि त्या लागत नाहीत, तर लावून घ्याव्या लागतात. यशस्वी माणसांच्या सवयी पाहा, त्या त्यांनी सातत्यानं कशा सांभाळल्या हे पाहा. मग कळेल त्यांचं महत्त्व! असं म्हणतात, सचिननं रिटायर्ड होईर्पयत कधी पेट प्रॅक्टिस किंवा नेट प्रॅक्टिसची वेळही चुकवली नाही. कधी धरसोड केली नाही. अशी स्वयंशिस्त आपल्यात आहे का? विचाराच स्वत:ला!
4) प्रेरणा? ती कोण देणार?
एक टिपिकल वाक्य आहे- तरुण पिढीसमोर आदर्श नाही, प्रेरणादायी असं काही नाही! इतरांनी कशाला द्यायला हवी प्रेरणा? जी यशस्वी माणसं असतात ती स्वत:च स्वत:ला मोटिव्हेट करतात. खचून जातात तेव्हा स्वत:च त्या गर्तेतून बाहेर पडतात. बाहेरून सतत प्रेरणोचे डोस पाजण्यापेक्षा स्वत:च स्वत:ला प्रोत्साहन देत राहणं, छोटय़ा यशानं स्वत:ला शाब्बास म्हणत पुढं जाणं हे एक कौशल्य आहे. ते शिकून घ्यायला हवं.
5) बहाणो
सतत बहाणो. अमुक झालं म्हणून तमुक झालं, तमुक झालं नाही म्हणून ढमुक झालं नाही. हे सतत असे बहाणो सांगत राहिलं तर यश कसं मिळणार? जी माणसं कमकुवत असतात, जी कच खातात तीच बहाणो सांगतात. त्यापेक्षा जे येईल ते खांद्यावर घेण्याची धमक असली पाहिजे. येईल त्याला भिडायला हवं. आणि जे चुकलं ते माङयामुळे असं म्हणण्याचंही धाडस पाहिजे! त्यामुळे यशाचा पहिला धडा म्हणजे बहाणो सांगायचे बंद करायचे. जे नाही जमलं ते आपल्यामुळे नाही जमलं असं म्हणत मान्य करायचं.
6) भूत मानगुटावर
आपल्या भूतकाळाचं आपल्या मनावर एक ओझं असतं. यशाचं आणि अपयशाचंही! पूर्वी आपण जे कमावलं तेही आपला पिच्छा सोडत नाही. यश गमावण्याचीही भीती वाटते आणि पूर्वी जो त्रस झालेला असतो तोही आपल्या पायांना बेडय़ा घालतो. ते भूत आपल्याला पळवता येतंय का बघा. जे झालं ते संपलं. उद्या वाट पाहतोय असं म्हणत आज जे वाटय़ाला येईल त्याला भिडायचं इतकंच!