मुलींनी शिकलं पाहिजे असं म्हणत, बेटी बचावचे नारे देणं सोपं आहे. पण आम्ही शिकायला बाहेर पडतो तेव्हा काय त्रास होतो याचा विचार करतं कोण?
आम्ही म्हणजे आम्ही ग्रामीण भागातल्या मुली. लाल डब्याच्या बसने जवळच्या गावी कॉलेजला जाणार्या. आईवडिलांना विनवून, घरकाम करून आम्ही कॉलेजात जातो.
जाताना वाटेत जो काय त्रास होतो, त्याचा कुणी विचार करतं का? मी नुस्तं छेडछाडीचं म्हणत नाही, ते तर आहेच! पण त्यापलीकडे आता अनेक गोष्टी छळतात.
सगळ्यात मोठा वैरी मोबाइल. जरा एखाद्या मुलीचा स्टॉपवर मोबाइल वाजला की झालीच चर्चेला सुरुवात. गावभर चर्चा, तुमची मुलगी मोबाइलवर बोलते. निमित्त पुरतं कॉलेजला जाऊ नको म्हणायला!
हे असे अनुभव किती येतात. ड्रेसवर ओढणी नाही घेतली चर्चा, जरा उंच टाचांचे बूट घातले चर्चा, एखाद्या पोराशी नुस्तं बोललं चर्चा, आणि त्यातून होणारं गॉसिप.
या सार्याचा मी नुकताच बळी ठरलेय. माझ्या घरच्यांनी माझं शिक्षणच थांबवलंय. कारण का तर गावातल्या अनेक लोकांनी सांगितलं की, पोरगी फार फोनवर बोलताना दिसते.
ना माझं कुणाशी अफेअर ना लफडं. मैत्रिणींशीच बोलायचे, पण घरच्यांना पटलं नाही!
आता मला सांगा, नुस्तं बेटी बढावचे नारे देऊन आमचं आयुष्य सुधारणार आहे का?
- एक मैत्रीण
या मैत्रिणीचा अनुभव वाचलात?
मुलींचं शिक्षण बंद करून तिला घरी बसवणं हे जुनाट वाटत असलं तरी आजही आपल्याकडे ग्रामीण भागात हे घडतं.?
बाहेरचं वातावरण सुरक्षित नाही इथपासून ते उलटून बोलते, मोबाइलवर बोलते, कुणाशी अफेअरच असल्याचा वहीम इथपर्यंत अनेक कारणं सांगत मुलींची शिक्षणं बंद होतात.
पैसे नाही, आर्थिक चणचण हे कारण तर आहेच.
या अशा अनुभवातून तुम्ही गेला आहात का?
तुमच्या अवतीभोवतीच्या मुलींचं शिक्षण असं बंद होताना तुम्ही पाहिलंय का?
नेमकं काय म्हणून मुलींचं शिक्षण बंद केलं जातं?
- काय तुमचा अनुभव?
नक्की लिहा.
पत्ता - संयोजक, 'ऑक्सिजन', लोकमत भवन, बी - ३, एम. आय. डी. सी, अंबड, नाशिक - ४२२०१०
अंतिम मुदत - ३१ मार्च २0१५.
पत्रावर - ‘शिक्षण बंद, बस घरी’ असा उल्लेख करायला विसरू नका.