‘नोकरी कशाला, स्वत:चा काहीतरी उद्योग करा.
-हे सांगणं सोपं, स्वयंरोजगार या विषयावर बोलणं तर फारच सोपं.
पण व्यवसाय करायचा, उद्योग सुरू करायचा म्हणजे काय खायचं काम आहे का? मुख्य प्रश्न भांडवलाचा. पैशाची सोंगं कशी आणणार? भांडवल कोण देणार?
कर्ज द्या म्हटलं तर कोण बसलंय हातात पैशाचं पोतं घेऊन की, या आणि घ्या कर्ज, करा उद्योग.’
-या अर्थाच्या पत्रांची आणि फोनची संख्या अलीकडच्या काळात बरीच वाढली. अनेक मुलांचा स्वयंरोजगार सुरू करण्याचा अनुभव जरी असा काहीसा कडवट असला तरी या प्रतिसादातून आम्हाला एक गोष्ट नक्की दिसली.
अनेक जण आपल्या ‘पायावर’ खर्या अर्थानं उभं राहाण्याचा प्रयत्न करताहेत. आपण नोकरी नाही, व्यवसाय करावा. शहरात जाऊन काम शोधण्यापेक्षा आपल्याच गावात, आपल्याच परिसरात काही स्वत:चा उद्योग सुरू करावा असं अनेक मुलांना वाटू लागलंय. अनेक जण आपापल्या वाटा शोधत रोजगार संधी स्वत: शोधूही लागलेत.
म्हणून ‘ऑक्सिजन’नं ठरवलं, स्वयंरोजगाराची दिशा देणारा एक अंकच का करू नये.?
तोच हा अंक.
या अंकात कर्ज कुठून मिळेल? व्यवसाय कसा सुरू करता येईल याची माहिती तर आहेच. आपल्या अवतीभोवतीची गरज ओळखून काही तरुण मुलांनी सुरू केलेल्या उद्योगाच्या कहाण्याही आहेत.
मात्र त्याचबरोबर आणखी एक गोष्ट समजून घ्यायला हवी.
ती म्हणजे स्वयंरोजगार या विषयाकडे पाहण्याची दृष्टी आपल्याला मिळायला हवी.
त्यासाठी ओळखायला हवी आपल्याच अवतीभोवतीची गरज.
आपल्याला कुठला रोजगार करावासा वाटतो याहीपेक्षा महत्त्वाचं आहे ते, आपल्या परिसरात कुठला रोजगार चांगला चालेल हे समजणं.
शहरात धावत सुटण्याची हावरी हौस बाजूला ठेवून आपण जिथं आहोत तिथंच हाताला काम मिळू शकतं का, हे तटस्थपणे पाहिलं तर सापडतील आपल्यालाच आपल्या व्यवसाय संधी.
आणि येत्या काळात अशा स्थानिक उद्योगांना, सेवा देणार्या व्यवसायांना विशेष मागणी असेल.
उदाहरणार्थ, छोट्या गावातही आज अनेक लोकांकडे टीव्ही, फ्रीज, मोबाइल, मिक्सर आहेत.यंत्रच ती, बिघडणारच. मग दुरुस्तीसाठी या सार्या वस्तू घेऊन लोकं शहराकडं धावतील का?
तर नाही. मिक्सर-कॉम्प्युटर-टीव्ही रिपेअर करण्याची सेवा देणार्या व्यवसायाची खेड्यातच नव्यानं गरज निर्माण होत आहे. ती गरज फक्त आपल्याला ओळखता यायला हवी.
सगळेच जण बीए-बीकॉम करतात म्हणून आपणही करायचं आणि मग बेरोजगारीच्या नावानं शिमगा करायचा, हे चित्र बदलता येणार नाही का.?
आपल्यासाठी अनेक शासकीय योजना आणि अभ्यासक्रम आहेत, जे करून स्वयंरोजगाराची एक नवी वाट आपल्याला नक्की शोधता येईल.
ती कशी शोधायची.
हे सांगणारा हा एक खास अंक.
स्वत:साठी सेल्फ एम्प्लॉयमेण्टची वाट शोधणार्या नव्याच सेल्फीची गोष्ट सांगणारा.