- गोकुळ विश्वनाथ महाजनमु.पो. वाघोड, ता.रावेर, जि. जळगाव
जुलै २००९. मी शिक्षणासाठी घर सोडलं...आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची. पण तरीही आपण बी.टेकला प्रवेश घेतलाच याचा आनंद ओसंडून वाहत होता. बी.टेक करायचं म्हणून शैक्षणिक कर्ज मिळवलं. जिद्दीनं अभ्यासाला लागलो. जुलै २०१३ मध्ये बी.टेक पूर्ण झालं. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मी दुसरा आलो.२०१३ ते २०१७. चार वर्षांचा काळ. गुजरात, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ या पाच राज्यांमध्ये हजारो किलोमीटर मी फिरलो. जगावेगळा अनुभव. शेकडो नवीन माणसं, विचार आणि वेगळं जग. सुख-दु:ख जे सोबत आलं त्याच्यासमवेत चालत होतो. खूप संकटं आली; पण वाट सोडली नाही म्हणून पेलत गाठलं एक सुवर्णयश. एम.टेक पूर्ण करून सुवर्णपदक मिळवलंच.सोप्पं नव्हतंच काही. लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती. शालेय स्तरावर उत्तम कामगिरी केल्यानं आत्मविश्वास अधिकच वाढला. वडिलांचा व्यवसाय शेतमजुरी. शेतीचं काम न मिळाल्यास केळीचे घड वाहण्यांचं जीवघेण्या कष्टाचं काम ते करायचे. आम्ही तिन्ही बहीण-भांवडं शिकत होतो. कष्ट पाहत होतो आईवडिलांचे. पहिली ते चौथी वाघोडच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो. पाचवी ते दहावी गावच्याच महाराष्ट्र विद्यामंदिर हायस्कूलमधून पूर्ण केले. अकरावी व बारावी तालुक्याला सरदार जी.जी. ज्यु. कॉलेज, रावेरला गेलो. आता मात्र खरी परीक्षा येऊन ठेपली, ती पुढच्या शिक्षणाच्या खर्चाची. सीईटीमध्ये कमी गुण मिळाल्याने निराशा झाली; पण आपल्याला बी.टेकला प्रवेश मिळावा ही इच्छा मनात होती. पहिल्याच यादीत नाव आलं; पण पैसे नव्हते.प्रवेशाची तारीख जवळ येत होती. प्रवेशासाठी दहा हजार रुपयांची गरज होती. माझ्या आईने आम्हाला उभारी दिली. पैसे कसे जमणार या विचाराने मीही भांबावून गेलो. शेवटी आईने उपाय सुचवला. दुसºया दिवशीच आईचं मंगळसूत्र मणी मोडून पैसे आणले. त्याच दिवशी बी. टेकला प्रवेश घेतला. घरी आलो रात्री. प्रवेश तर मिळाला होता; पण आजही तो दिवस माझ्या अंगावर शहारा आणतो.त्यानंतर बी.टेकची चार ही वर्षं खूप अभ्यास केला. शेवटच्या वर्षी मनात भविष्याविषयी घालमेल चालू होती. नोकरी करावी की एम.टेक? मी अभ्यासात अव्वल असल्यानं सर्वच जण एम.टेकचा सल्ला देत होते. नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं. घरची परिस्थिती पाहता मी नोकरी करायचं ठरवलं. अदानी विल्मर लि. या कंपनीमध्ये माझी कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली. कुटुंबीयांना आनंद झाला. आयुष्यानं नवं वळण घेतलं. अहमदाबादला नोकरीच्या सुरुवातीला एक महिना उद्योगजगताची तोंडओळख करून देण्यात आली. विशिष्ट कार्यक्र मांमधून विविध मूल्य शिकवली गेली. त्यानंतर साडेतीन महिने हल्दीया, पश्चिम बंगालला पाठवलं गेलं. तेथील प्रशिक्षणानंतर आंध्र प्रदेशातील काकीनाडा शहरात मी दुसºया प्रशिक्षणासाठी गेलो. प्रशिक्षणानंतर पुढचे दीड वर्ष मी तिथं कार्यरत होतो. या दरम्यान घरची खूप आठवण यायची. एम.टेकचं स्वप्न मनात घर करून होतं. नोकरी करतानाच गेट परीक्षेचा अभ्यास केला. प्रयत्नांना अखेर यश मिळालं अन् मी गेटच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो. एम. टेकच्या दिशेने वाटचाल चालू झाली. माझ्या सहकारी मित्रांनीसुद्धा मला उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं. शेवटी नोकरीचा राजीनामा दिला आणि एम.टेकला प्रवेश घ्यायचं ठरवलं.मला अपेक्षित असलेल्या तामिळनाडू राज्यातील तिरूचिरापल्लीस्थित भारत सरकारच्या नामवंत एनआयटीला मला प्रवेश मिळाला. स्वप्न सत्यात उतरलं. पुन्हा एक नवीन राज्य अन् नवीन मित्र. राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी शिक्षणाचा चांगला अनुभव मिळाला. विविध कार्यशांळामध्ये सहभागी झालो. एम.टेकमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार व ‘शैक्षणिक गुणवत्ता पुरस्कार’ मिळाला. पुणे व तिरुचिरापल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय विज्ञान महासंमेलनांमध्ये ‘सर्वोत्कृष्ट मौखिक सादरीकरण’ पुरस्कार पटकावले. अन् शेवटी आयुष्यात तो सुवर्णक्षण येऊन ठेपला. २५ जून २०१७ रोजी एम.टेकचा अंतिम निकाल घोषित झाला. मी पहिला आलो. सुवर्णपदकावर नाव कोरलं गेलं.पदवी प्रदान सोहळा उत्साहात पार पडला. इन्फोसिसचे संस्थापक पद्मविभूषण नारायण मूर्ती यांनी मला ‘सुवर्णपदक’ देऊन तर टाटा ग्रुपचे अध्यक्ष श्री.एन. चंद्रशेखरन यांनी ‘गुणवत्ता प्रमाणपत्र’ देऊन सन्मानित केलं. तो क्षण, तो आनंद शब्दात नाही सांगू शकतं. माझे आईवडील, मामा-मावशी, मित्र, आजवरचे शिक्षक या साºयांची साथ होती, त्यांनी वेळोवेळी मदत केली म्हणून इथवर पोहचलो, असं वाटलं.सध्या मी चेन्नईमधील नावाजलेल्या मुरुगप्पा ग्रुपच्या चोलामंडलम एम.एस. रिस्क सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीमध्ये ‘प्रक्रि या सुरक्षा अभियंता’ म्हणून कार्यरत आहे. वाघोड ते चेन्नई असा प्रवास आता एका नव्या वळणावर येऊन पोहचलाय..