- कलिम अजीम (मुंबई)रमजान.आपल्या जगण्यात काही सुखाचे क्षण ‘यादें’ बनून राहतात आणि त्या आठवणी मग आयुष्यभर मनात आनंद भरतात. तसा हा महिना. तसे हे दिवस.या महिन्यात साऱ्या मोहल्ल्यात आनंदाचं वातावरण असतं. खरं तर घरोघरच एक खासी लगबग असते. घरांत महिला मंडळाचं काम बरंच वाढतं. भल्या पहाटे तीनच्या सुमारास घरातल्या महिलांचा दिवस सुरू होतो. मध्यरात्री होणाऱ्या ‘तहज्जुद’च्या नमाजनंतर महिला सहरीच्या कामाला लागतात. सहरी म्हणजे, रोजा ग्रहण करण्यापूर्वीची न्याहारी किंवा जेवण. त्यासाठी पूर्ण स्वयंपाक केला जातो. स्वयंपाक तयार होताच गाढ झोपलेल्या मंडळींना उठवायची जबाबदारीदेखील या गृहिणीच सांभाळतात. आमच्या लहानपणी सहरी आटपायला फजरची अजान व्हायची. अर्थात फजरची अजान ही सहरी संपवण्याची प्रमाणवेळ समजली जायची. आता मात्र, रमजानचे विशेष टाइम-टेबल कार्ड पहिल्याच दिवशी वितरित केले जातात. त्यात सहरी आणि इफ्तारची प्रमाणवेळ दिलेली असते. योग्य वेळेवर सहरी आणि इफ्तार व्हावीत, असा पायंडा आहे.माझे अनेक दोस्त विचारतात, गाढ झोपेतून उठल्यावर जेवण जातं का? तर जातं. सहरीची आपली अशी एक खास बात आहे. मुलं आनंदानं लवकर उठून ही सहरी करतात. एकमेकांना उठवतात. आपल्याला झोप आवरली नाही आणि सहरीची वेळ संपली की उपाशीपोटीच रोजा ग्रहण करावा लागतो. त्यामुळे या सहरीसाठी भल्या पहाटे उठणं या दिवसांत हमखास होतंच. या महिनाभरात जास्तीत जास्त वेळा कुरआनचं अध्ययन व्हावं असा अलिखित नियमच असतो. महिनाभरात साधारण तीन ते चार वेळा अख्खं कुराण वाचलं जातं. तसंच नमाजही किमान पाच वेळा तरी पठण केली जावी. यालाच इबादत म्हणतात. आमच्या लहानपणी मित्रांत जास्तीत-जास्त इबादत कोण करेल याची स्पर्धा लावली जायची. अजूनही तरुण दोस्तांमध्ये अशी ओढ लागते आणि त्यानिमित्तानं मनावर चांगले संस्कार घडत जातात.दिवस असा सरता सरता संध्याकाळी इफ्तारची तयारी सुरू होते.इफ्तारला कच्च्या (पेंड) खजुराला जास्त महत्त्व असते. दिवसभराचा रोजा गोड खाऊनच इफ्तार करायचा असतो. एखादं खजूर खाऊन दोन घोट पाणी पिणं. त्यानंतर काहीतरी न्याहरी घेणं हा इफ्तारीचा बेसिक नियम आहे. अन्यथा बकाबका खाल्ल्यानं अपचनाचे त्रास सुरू होतात. तसंच रिकाम्या पोटी जास्त पाणी पिल्यानं उलट्या व मळमळ होते. इफ्तारनंतर एखाद्या तासानं व्यवस्थित जेवायचं असतं. रात्री तरावीह म्हणजे विशेष नमाज होते. या नमाजमध्ये कुराणचे दररोज दोन ते तीन पारे पठण केले जातात. त्यामुळे ही नमाज साधारण तासभर चालते. ३० दिवसात संपूर्ण कु राण पठण होतं. या महिनाभरात घरा-घरातलं वातावरण अध्यात्मिक होऊन जातं. घरातली मनोरंजनाची साधनं याकाळात बंद केली जातात. घरात प्रत्येकजण कुराण आणि पारेंचं पठण करत असतो. तरुण मुलं याकाळात हे सारं वाचून इबादत करतात.रमजानपूर्वीच खरं तर घरांत उत्सवी माहौल असतो. घरातल्या सर्व वस्तू घासून-पुसून स्वच्छ केल्या जातात. घरातलं धुणं काढलं जातं. घर-दुकानाला रंग-रंगोटी केली जाते. याकामात घरोघर तरुण आघाडीवर असतात. महिनाभर घरखर्चासाठी हात थोडासा सैलच केला जातो. घरात या महिन्यात बाहेरून येणाऱ्यास आदरातिथ्य करण्यास मोठं महत्त्व आहे. या काळात खातीरदारी वा मेहमान नवाजीचं वेगळं महत्त्व सांगितलं जातं. रमजान महिन्यात जेवू घालणं मोठ्या सत्कर्माचं काम आहे. रोजेदारांना इफ्तार करवणं म्हणजे मोठं पुण्य समजलं जातं. त्यामुळे महिनाभर इफ्तार पार्र्ट्या रंगत असतात. बड्या प्रशस्त हॉटेलपासून ते एखाद्या टुरिस्ट हबला जाऊन इफ्तार पार्ट्या हल्ली दिल्या जातात. मात्र अनेकांच्या घरातही इफ्तारच्या मोठ्या पंगती बसवल्या जातात. मोठ्या आत्मीयतेनं रोजेदारांना इफ्तार करवला जातो. महिनाभर मोहल्ल्यातून मस्जिदींमध्ये रोजेदारांसाठी पदार्थांच्या थाळ्या पाठवल्या जातात. मोहल्यांत राहणारे बिगरमुस्लीम दोस्तही यात सहभागी होतात.रमजान हा केवळ उपाशी राहण्याचा महिना नाही, तर हा आत्मशुद्धीचा महिना समजला जातो. महिनाभर अन्न-पाणी वर्ज्य करून स्वत:चीच परीक्षा घेतली जाते. उपाशी राहून आपल्या इंद्रीय शक्ती आटोक्यात आणता याव्यात. आपल्या नफ्स अर्थात उमाळा मारणाऱ्या इच्छांवर विजय मिळवता यावा, सदाचार ग्रहण करावेत. वाईट विचार आणि कर्मांना थारा न देता चांगलं आचरण करावं, हा सुप्त हेतू रमजानचा आहे. रोजा स्थितीत केवळ उपाशी राहून झोपा काढणं किंवा आराम करण्यास मनाई करण्यात आहे. रोजा स्थितीतही आपली दिनचर्या थांबू न देता कामं करत राहावीत, असा नियम घालण्यात आला आहे. रमजानच्या शेवटच्या दहा दिवसाचं खूप महत्त्व आहे. महिना संपतोय याची रुखरुख जाणवायला लागते. त्यामुळे महिन्याचे खास क्षण राखून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या योजल्या जातात. या दिवसात कुटुंबातले परगावी असलेले सदस्य मुळगावी परत येतात. नातवंड आणि मुलींना खास बोलावणं पाठवून आणलं जातं. महिन्याच्या शेवटच्या आठवड्याचं खास सेलिब्रेशन सुरू होतं. खरेदी आणि हॉटेलिंगची आठवडाभर धूम असते. कुटुंबातील अनेकजण एकत्र आले सहरी आणि इफ्तारी हा एक कौटुंबिक आनंदी मेळा असतो. अलीकडे हॉटेलिंगचं फॅड वाढलं. सुरुवातीला फक्त हे फॅड महानगरापुरतं मर्यादित होतं. पण आता छोट्या शहरातही व्हेज-नॉनव्हेज खानावळी इफ्तारीचा खास इंतजाम करतात. इफ्तारीसाठी हॉटेलची खास सजावट केली जाते. मित्रमंडळी तसंच घरातलं अख्खं कुटुंब इफ्तार पार्टीसाठी हॉटेलला जातात. मित्र-परिवार आणि नात्यातल्या मंडळींना खास मेजवानी दिली जाते.या दिवसांत खाण्यापिण्याची मौज असते. खाद्यपदार्थांची रेलचेल असते. दिल्ली, हैदराबाद, औरंगाबाद, भोपाळ, लखनऊ, मुंबई, म्हैसूर ही शहरं रमजानच्या विशेष खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत. चविष्ठ नॉनव्हेजचे असंख्य प्रकार तर असतातच; पण औरंगाबादला फालुदा, मुंबईला मालपोवा, दिल्लीला पराठे रात्रभर ग्राहकांच्या सेवेत रु जू असतात. हॉटेलमध्ये सहरीची खास सोय केलेली असते. दिल्लीला चांदनी चौक, मुंबईला महमंद अली रोड, औरंगाबादला बुढ्ढी लेन, हैदराबादला चारमिनार अशी प्रसिद्ध ठिकाणं आहेत. जिथं खवय्यांसाठी विशेष मेजवानी असते. तरुण मुलं याकाळात या भागा अवश्य गर्दी करतात.आणि त्यासोबत होते खरेदी. ईदला नवा कपडा घालणं शुभ मानलं जातं. प्रत्येकजण आपल्या कुवतीनुसार कपड्यांची खरेदी करतो. त्यामुळे घरात ईदला लग्नघरासारखी कपड्यांची खरेदी होते. तरुण पठाणी, शेरवानी, कुडता-पायजमाला पसंती देतात तर तरुणी जरीदार आणि टिकल्यांच्या वस्रांची खरेदी करतात. यासह रोज वापरण्यासाठी एखाद-दुसरा ड्रेस हमखास ईदला घेतला जातो. उच्च दर्जाची अत्तरं हे तर खास आकर्षण.अशा अनेक आठवणी, अनेक सुखद भावना या काळाशी कायमच्या जोडल्या जातात. साऱ्यांना सोबत घेऊन आनंद साजरा करताना हाताला देण्याची सवयही लावली जाते. आणि या साऱ्यासह जेव्हा आनंदाची ईद येते, तेव्हा ती मनापासून मग साजरी केली जाते!
ईद....आनंदाची-सुखाची-समाधानाची!
By admin | Updated: June 30, 2016 16:39 IST