- दीपक म्हस्के
तसं बघितलं गेल्यास मी ‘लोकमत’चा नियमित वाचक, पण मधल्या काळात कामाच्या व्यापात वाचण्यातला सातत्यपणा कमी झाला असला तरी लोकमतबरोबर येणा-या ‘ऑक्सिजन’ पुरवणीची मी आजही दर शुक्रवारी आतुरतेने वाट पहातो. ‘ऑक्सिजन’मध्ये अलीकडेच मी ‘आम्ही पाहिला बदल’ या शीर्षकाचा स्वाती चक्रवर्ती यांचा लेख वाचल्याचं आठवतं.
तो लेख वाचत असताना मी पण माङया भूतकाळात शिरलो. आणि माङया डोळ्यासमोर उभं ठाकलं माझं गाव. भोकर तालुक्यात महाराष्ट्र व आंध्रच्या सीमेवर वसलेलं छोटंसं खेडं. खेडं कसले 3क् ते 35 घरांची वस्ती. याच वस्तीला लागून दोन तांडे म्हणजे बंजारा समाज. तसं पाहिल्यास भोकर तालुका माळरानात वसलेला, सिंचनाची कुठलीही व्यवस्था नसलेला, विकासापासून कोसो दूर. अशा या गावात एम.एस.डब्ल्यू.ची पदवी घेऊन मी पाऊल ठेवलं तेव्हाचा हा अनुभव.
गावातील एखाद्या व्यक्तीकडून काही गुन्हा, अपराध झाला किंवा भांडणं झाली तर त्याची तक्रार पोलीस स्टेशनर्पयत न जाता ती पंचायतीच्या माध्यमातून त्या तक्रारीचे निवारण केलं जातं. सदर तक्रारीत संबंधित व्यक्ती दोषी आढळला की, त्याला गावच्या पंचायत प्रमुखांकडून शिक्षा म्हणून दंड स्वरूपात पैसा वसूल केला जातो. मिळालेल्या पैशातून संध्याकाळी संपूर्ण गावात मटन शिजवून खाल्लं जायचं. या अजब प्रथेचं सुरुवातीला मला नवल वाटलं आणि रागपण आला. म्हणून मी ठरवलं या असल्या प्रथेविरुद्ध आपण उभे ठाकायचं. आणि मग हळूहळू मी असल्या पंचायतीला विरोध करू लागलो. पण माझं ऐकणार कोण?
तुझं शहरातलं शहाणपण इथं चालणार नाही, असं मला सुनावण्यात आलं. मग मी एक शक्कल लढविली. पंचायत व्यवस्था जरी अशीच कायम राहिली तरी गुन्हेगाराला झालेल्या शिक्षेच्या स्वरूपातून मिळणारा पैसा सामाजिक कार्यासाठी वापरावा असं सुचवलं. उदा. त्यामधून गावातील मंदिरासाठी लागणारे पैसे, प्राथमिक शाळेतील मुलांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशा गोष्टी युवकांना संघटित करून मी पटवून देऊ लागलो. सुरुवातीला याही गोष्टीला प्रचंड विरोध झाला. पण गावपातळीवर युवकांच्या माध्यमातून गावात सार्वजनिक गणोशोत्सवात गाव स्वच्छता मोहीम, वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजूषा आदि कार्यक्रमातून विरोध करणा:या युवकांनाच आम्ही जवळ केलं. त्यांनाही आमचं म्हणणं पटलं. आता त्या पैशातून गावात चार गोष्टी ब:या घडताहेत याचंच मला समाधान आहे.
गावातील ती जुनी व्यवस्था बदलण्यात मला अपयश आलं हे खरंय, पण मधला मार्ग काढत युवकांच्या मदतीनं काहीतरी बरं घडलं हेही काय कमी?
हे सगळं इथे सांगण्याचं कारण म्हणजे मी काही फार मोठं काम केलंय अशातला भाग नाही; परंतु हा माझा अनुभव तुमच्याशी शेअर करावासा वाटला. संपूर्ण बदल ना सही, छोटा बदल तरी आपण घडवू शकलो एवढाच आनंद वाटून घेतोय या निमित्तानं.