- नम्रता फडणीस
नभ उतरू आलं, मन चिंबाड झालं..
हे गीत ओठावर रूंजी घालू लागलं की
हिरवाईनं नटलेल्या निसर्गाच्या कुशीत विसावलेल्या गड-किल्यांच्या अभेद्य भिंती तरूणाईला आकर्षित करू लागतात...
आणि मग प्लॅनिंग सुरू होतं ‘ट्रेकिंग’चं.
वर्षासरींच्या धारा अंगावर झेलत डोंगर द-यातून निसर्गाचा
आस्वाद घेत भटकंती करण्याचा क्र म तरूणाई कधीच चुकवत नाही.
पण याच ट्रेकिंगच्या, भटकंतीच्या आणि गड-किल्ले सर करण्याच्या प्रयत्नांमध्ये काही तरूणांना जीव गमवावा लागल्याच्या घटनाही अलीकडच्या काळात वाढत चालल्या आहेत, जी चिंतेची बाब बनली आहे. त्यात सेल्फी हा जीवघेणा प्रकार. पावसाळा सुरू झाला की, बुडून मृत्यूमुखी पडल्याच्या घटना सून्न करून टाकतात. काही तरुण जीव त्यात हकनाक बळी पडतात.
हे सारं थांबायला हवं. आपला जीव लाख मोलाचा हे पुन्हा पुन्हा सांगण्याची वेळ आलेली आहे.
खरंतर जगभरात विखुरलेल्या पर्वतरांगांमध्ये पावसाळ्यात फारसं ट्रेकिंग होत नाही. मान्सून हे खराब वातावरणाचं निर्देशक ठरतं, पण सहयाद्रीच्या पर्वतरांगांचा विचार केल्यास सर्व गोष्टींची समीकरणेच बदलून जातात.
कडेकपारीतून वहाणारे धबधबे, गर्द हिरवाई, गडांवरून जमिनीवर उतरलेले नभ, अशा वातावरणामुळे पश्चिम घाट सुंदर भासू लागतो, तरूणाईसाठी हाच ट्रेकिंगसाठी बेस्ट सिझन असतो. त्यामुळेच वर्षागणिक पावसाच्या काळात ट्रेकर्सची संख्या वाढत आहे. दूर्देव म्हणजे त्याच्याबरोबरीने अपघातांचे प्रमाणही वाढत चालले आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरांगा पावसामध्ये भटकंतीचा मनसोक्त आनंद देत असल्यातरी या दिवसांमध्ये जंगलांनी वेढलेले आणि निसरड्या पायवाटा असलेले किल्ले शक्यतो टाळावेत. पावसाच्या काळात डोंगराच्या कडा कोसळण्याची भिती अधिक असते. निसरड्या वाटेमुळे जखमी होण्याची शक्यता अधिक असते, ग्रामीण भागात डोंगरावरून पाण्याचा लोंढा वरून मोठा प्रमाणात येऊन पूरसदृश्य स्थिती निर्माण होऊ शकते, जे ट्रेकर्ससाठी साठी घातक ठरू शकते. राजमाची, लोहगड, विसापूर, तिकोना, राजगड, पुरंदर यासारख्या ज्या किल्ल्यांचे ट्रेकिंगचे रूट्स ठरलेले आहेत, शक्यतो त्या रुळलेल्या वाटांनीच जावे. उगीच भलते साहस करू नये.
पावसाच्या हंगामात ढगांनी वेढलेले धुकं आणि अंधुक हवामान हा अनुभव अनेकदा येतो, स्वर्गात तर चालत नाही आहोत असा मस्त फिल येतो, पण अशा वातावरणात अनोळखी वाटा निवडायचा प्रयत्न करू नका, अन्यथा वाट चुकण्याची शक्यता अधिक आहे. अनुभवी ट्रेकर्सच्या मार्गदर्शनाविना माहित नसलेल्या किल्ल्यांवर भटकंती करणं टाळलेलंच बरं!
सुरिक्षतता महत्वाची
पावसामध्ये सर्वात जास्त आकर्षण असते ते धबधबे आणि खळाळत्या प्रवाहांचे. पण पाण्याच्या प्रवाहाचा सामना करताना अधिकच काळजी घेणं आवश्यक आहे. जागा पूर्णपणे माहिती असल्याशिवाय धबधब्याच्या आतमध्ये आणि उंचापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू नका. अत्यंत निष्काळजीपणे वावरणा-या अनेकांना याचा
फटका बसला आहे.
हे लक्षात ठेवलेलं बरं..
* ट्रेकिंगला जाताना जिथं जायचं त्या मार्गाचा नकाशा जवळ ठेवा.
* मार्ग कितीही लांबचा असेल तरी शॉर्टकटचा वापर करू नका.
* अनुभव आणि माहिती, मार्गदर्शक सोबत असल्याशिवाय आपणहून नवीन मार्ग शोधू नका. स्थानिक गाईड बरोबर असलेला उत्तम.
* हरवलात तरी पँनिक होऊ नका. स्वत:जवळ अत्यावश्यकतेसाठी एक तरी पाण्याची बाटली जवळ ठेवा.
* बँटरी संपणार नाही अशा पद्धतीने अचूकपणे मोबाईलचा वापर करा. संवादासाठी दुसरे एखादे साधनही जवळ बाळगा.
* पावसाच्या हंगामात किडे-जळवा चावण्याची शक्यता असल्याने पूर्ण
बाह्यांचा शर्ट घालावा. अंगाला चिकटलेल्या जळवा काढण्यासाठी तंबाखू
मिश्रित पाण्याचा वापर करावा.
* ट्रेकिंग करताना सापांपासून बचाव करण्यासाठी जवळ काठी बाळगावी. रात्रीचा मुक्क्काम करताना सर्व ठिकाण आतून-बाहेरून तपासून घ्यावे.
* निसरड्या वाटांचा वापर करायचाच नाही.
* प्रथमोपचार पेटी जवळ बाळगावी.
* आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निसर्गाला हरवण्याचा प्रयत्न करू नये. त्याच्यासोबत शांतपणे, नम्रपणे वागलेलं बरं!