मित्र किंवा मैत्रीण. आम्ही भाडय़ानं देतो. काही तास, काही दिवस तुम्हाला जर मित्र किंवा मैत्रीण हवी असेल तर आमच्याशी संपर्क साधा. अमुक पैसे द्या. तुम्ही म्हणाल तिथं तेवढय़ा वेळेसाठी तुम्हाला ‘सच्ची’ मैत्री लाभू शकेल.’
- अशी जाहिरात जर तुम्ही कुठं वाचली तर तुम्ही काय म्हणाल?
कदाचित म्हणाल, निव्वळ कलियुग!
असं कुठं होतं का?’
मित्र किंवा मैत्रीण कशी काय कुणी भाडय़ानं घेऊ शकतं?
असल्या नात्याला मैत्री कशी म्हणता येईल!
मैत्री हे पवित्र नातं, ते होतं, अपेक्षाविरहित असतं आणि जिवाला जीव देतं.
इत्यादी. इत्यादी बरेच विचार आपल्या मनात ही ‘अशी’ जाहिरात तरळून जाऊ शकतात.
पण तरीही हे खरं आहे की, सध्या अमेरिकेत हे ‘रेण्ट अ फ्रेण्ड’ नावाचे स्टार्ट अप्स कमालीचे लोकप्रिय होत आहेत आणि एक उद्योग म्हणून नावारूपालाही येत आहेत.
एकेकटय़ा, नोकरदार तरुण मुलामुलींच्या जगात या स्टार्ट अप्सने मैत्रीचे नवे रंग भरायला तर सुरुवात केलीच आहे; पण त्यातून अनेकांसाठी नवीन उद्योग पर्याय तयार झाले आहेत.
आयडिया साधी आहे, काही तरुण मुलांनी एकत्र येऊन ही कल्पना लढवत एक अॅप आणि वेबसाइट तयार केली..
तिथं विविध विषयात रस असलेले अनेकजण स्वत:हून रेण्टेड फ्रेण्ड म्हणून काम करायला आणि त्यातून पैसे मिळवायला तयार आहेत तर काहीजण निव्वळ आपल्या विषयात रस असलेल्यांशी ओळख व्हावी म्हणून हे काम करीत आहेत..
तर काम काय?
समजा तुम्हाला एखादं म्युङिायम पहायला जायचं आहे. पण तुमच्या कुणाच मित्रला यात रस नाही.
किंवा बळजबरी नेलं तरी त्यातलं त्यांना काही कळत तरी नाही किंवा बोअर होतं. त्यांच्या कंपनीत म्युङिायम पाहण्याचा तो आनंद आणि चर्चा, रसग्रहण असं काहीच तुमच्या वाटय़ाला येत नाही.
मग तुम्ही या रेण्ट अ फ्रेण्ड साइटवर जाता.
तिथं या विषयात रस असलेलं कुणीतरी असतं.
मग तुम्ही मंगळवार दुपार अशी वेळ ठरवता. म्युङिायममध्ये भेटता, ओळख करून घेता आणि त्या विषयात रस असलेल्या व्यक्तीसोबत त्याचं ज्ञान, कलास्वाद वाटून घेत ते म्युङिायम पाहता.
पैसे ऑनलाइन भरून टाकता.
विषय संपला.
पुढच्या वेळी पुन्हा तेच. त्यातून खरीखुरी मैत्रीही होऊ शकतेच.
आपल्या जगण्यातल्या वेगात समआवडीनिवडीचे लोक शोधणं, अनुभव कक्षा वाढवणं आणि आपल्याला जे जगावंसं वाटतं ते जगून घेणं, यासाठी ही ऑनलाइन सव्र्हिस.
त्याला म्हणतात रेण्ट अ फ्रेण्ड.
- ऑक्सिजन टीम