डॉ. आनंद नाडकर्णी
अनिश्चितता, हा तर निसर्गाचाच स्वभाव आहे. निश्चितता, कधीच, कुठेच नव्हती. पुढेही ती कायमस्वरूपी कधीच असणार नाही. मग त्या अनिश्चिततेला घाबरायचं कशाला? तिला तोंड द्यायला हवं. आपलं मानसिक आरोग्य जर चांगलं असेल तर अशा अनिश्चिततांना आपण चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो. अनिश्चितता आली की आपल्या मनात धोक्याची घंटा वाजायला लागते; पण हा ‘धोका’च आपल्यासाठी ‘मोका’ही असतो. कारण त्यानिमित्तानं आपण सावध होतो आणि पुढच्या संकटांवर मात करण्याची आपली क्षमता आपण वाढवत जातो. कोरोनामुळे आज काहीशी कुंठित अवस्था झाली असली तरीही सर्व काही थांबलेलं नाही. हा केवळ विराम आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. या विरामाचा उपयोग आपल्याला पुढची उडी घेण्यासाठी करायचा आहे. आपला आजचा विराम, उद्याच्या उत्पादकतेसाठी आहे. व्यक्ती म्हणूनही आणि नागरिक म्हणूनही.
अचानक आलेल्या कोरोनामुळे आपला वेग एकदम मंदावला, आपल्या देशाच्या प्रगतीला खीळ पडली; पण हेही तितकंच महत्त्वाचं आहे की आजचा हा विरामच पुढच्या गतीसाठी उपयोगी पडणार आहे. आजवर कोणत्याच देशापुढे, जगापुढे काहीच अडचणी आल्या नाहीत असं नाही; पण इतिहास सांगतो, जेव्हा जेव्हा अशा बिकट आपत्ती आल्या, त्यावेळी ज्या समाजानं पुढच्या ङोपेची तयारी आधीच करून ठेवली. तो समाज, तो देश या आपत्तींतून लवकर बाहेर तर पडलाच, पण तो पूर्वीपेक्षा अधिक सामथ्र्यशाली बनला. कारण मनाची ही ताकद त्यांनी वापरली. कोरोनाच्या संकटातून जग बाहेर पडेल, त्याला कदाचित वेळ लागेल, तरीही ही स्थिती कायम असणार नाही; पण त्यानंतरचं आव्हान अधिक मोठं असणार आहे. त्या आव्हानाला सामोरं जायचं तर मनाची मशागत आजच आणि सतत आपल्याला करावी लागेल. आत्ताच आपण त्या तयारीला लागू या. आज आपण सारेच घरी आहोत. आपल्या सा:या कृतींवर बंधनं आली आहेत; पण अशाही स्थितीत स्वत:ला उत्पादक ठेवणं हे राष्ट्रकार्य आहे. आपण कायम सकारात्मक राहू शकत नाही, कधी कधी असाहायता येते, पाठी खेचणारे विचार मनाला हैराण करतात. आज कोरोनाच्या काळात अनेकांची ही स्थिती झाली आहे; पण जगातली कोणतीही साथ कायमस्वरूपी कधीच टिकली नाही. भरती आली, तशी ओहोटीही येणारच; पण हाच काळ आहे, मानसिकदृष्टय़ा कणखर राहण्याचा, प्रय} करण्याचा. प्रय}ांची पराकाष्ठा केल्याशिवाय कोणतीही साथ, कोणतीही आपत्ती सहज मागे फिरलीय, असंही कधीच झालेलं नाही. कोरोनाच्या साथीमुळे जिवाला धोका नक्कीच निर्माण होऊ शकतो; पण हा आजार जीवघेणा नाही. आपल्या प्रय}ांवरचा विश्वास आपल्याला शब्दांतून आणि कृतीतूनही दाखवावा लागेल. त्यासाठी भीती आणि सावधपणा, काळजी करणं आणि काळजी घेणं यातला फरक आपल्याला समजून घ्यावा लागेल. शारीरिक आरोग्य उत्तम राहाण्यासाठी आपण प्रय} करतोच आहोत. पण, मानसिक आरोग्य आणि आपलं मानसिक हायजिन उत्तम राहावं यासाठीही तेवढीच काळजी आपल्याला घ्यावी लागेल. अनुरूप विचार आपल्याला करता येत असेल तरच अनुरूप भावना निर्माण होतील आणि अनुरूप भावना असतील तरच अनुरूप कृतीही होईल. देशाच्या, समाजाच्या पातळीवर तसं जर होत नसेल किंवा त्यात अडचणी येत असतील, तर त्याची व्यापक किंमत मोजावी लागते. ती किंमत मोजण्याची वेळ कोणावरच येऊ नये, यासाठी मनाचा विचार महत्त्वाचा. इतर कोणत्याही इमर्जन्सीइतकीच, किंबहुना त्याहून अधिक मनाची ही इमर्जन्सी महत्त्वाची. माणसं कोलमडून न पडता, पुन्हा हिमतीनं उभी राहायची असतील तर मनाच्या या आरोग्याकडे आपणही जाणीवपूर्वक लक्ष देऊ या. आज, आत्ता, या क्षणी.
1. शरीराचं आरोग्य जसं महत्त्वाचं, तसंच मनाचं आरोग्यही महत्त्वाचं; पण ‘इमर्जन्सी हेल्थ’मध्ये मानसिक आरोग्याचा विचारच आपण केलेला नाही. आताच्या कोरोना संकटातही तो दिसत नाही. 2. खरं तर हाच काळ आहे, ज्यावेळी तुमचं मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्याची सर्वाधिक गरज आहे, असते; कारण मनाचं आरोग्य चांगलं असेल तरच शारीरिक आणि कृतिशील पातळीवर विधायक पावलं उचलता येऊ शकतात. 3. ‘हेल्थ इमर्जन्सी’मध्ये मानसिक आरोग्याच्या समस्यांनाही तातडीनं आणलं पाहिजे. त्यासाठी सरकार, प्रशासन, स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा. 4. अडचणीच्या, बिकट परिस्थितीत अनेक नॉर्मल लोकांनाही टेन्शन येतं, चिंता वाढते, डॉक्टरही त्याला अपवाद नाहीत. 5. ज्यांना अगोदरच असा त्रस आहे, नैराश्य येतं, त्यांचं प्रमाण अशावेळी आणखी वाढू शकतं. 6. कुठल्याही व्याधीच्या रुग्णाला जशी अत्यावश्यक वैद्यकीय सेवेची गरज पडू शकते, तशीच गरज मनाचा आजार झाल्यावर, वाढल्यावर लागू शकते; पण तो विषयच कुणाच्या अजेंडय़ावर नाही.7. अशा रुग्णांसाठी इमर्जन्सी सोयी-सुविधा निर्माण करतानाच त्यांच्यावर वैद्यकीय, मानसिक इलाज करणा:यांना, डॉक्टरांना ‘इमर्जन्सी सेवे’चा दर्जा द्यायला हवा. 8. - सरकारी पातळीवर त्यासंदर्भातलं ‘नोटिफिकेशन’ही तातडीनं निघायला हवं.
इमोशनल हायजिन! म्हणजे काय? ते कसे सांभाळायचं? या लेखाचा पहिला भाग इथं वाचा
https://www.lokmat.com/oxygen/coronavirus-practice-mental-emotional-hygiene-corona-crisis/