प्राची पाठक
घरचे नाही म्हणतात’, हा एक फारच कॉमन डायलॉग जिकडे तिकडे ऐकायला मिळतो. कुणी काहीही सुचवलं आणि त्यात खोडा घालायचा असेल की आपला स्टॅण्डर्ड डायलॉग ठरलेला - घरचे नाही म्हणतात ! कधी कधी ‘घरचे नाही म्हणतात’ हे उत्तर आपण परस्परच देऊन टाकतो. खरंतर आपण त्यांच्याशी बोलणं टाळायला लागतो. एकटं झुरत बसतो किंवा उगाचच जास्तीची बंडखोरी करायला जातो. म्हणजे दोन्हीकडून मनात कचकच आहेच. ती पुढे वाढतच जाते.
* काय करता येईल? कधी कधी घरातल्या लोकांना आपल्या मनातल्या गोष्टींची काहीही जाण नसते. आपलं फील्ड, आपलं विश्व आणि त्यांचं फिल्ड, त्यांचं विश्व पूर्ण वेगळं असू शकतं. त्यामुळे, जे आपल्यासाठी उत्तम आहे, असा आपल्याला पक्का विश्वास वाटत असतो, त्याबद्दल त्यांना काही कल्पनाच नसते. त्यात त्यांना काही अर्थही वाटत नसतो. म्हणून केवळ वडीलकीच्या नात्याने, कधी घरातलं बजेट पाहून, कधी घरातल्या इतर समस्या पाहून ते आपल्याला सरळ ‘नाही’ म्हणतात. पण आपण आपली बाजू त्यांना नीट समजावून सांगतो का? आपल्या डोक्यातले प्लॅन अमुक पद्धतीने राबवले तर त्याचा आपल्याला, आपल्या करिअरला फायदा होणार आहे याची कल्पना आपण त्यांना मनमोकळेपणाने देतो का? घरातल्या लोकांशी आपण जितका चांगला संवाद ठेवू, तितक्या चांगल्या प्रकारे ते आपल्याला समजून घेऊ शकतात.
त्याने काय होईल?1- आपल्या डोक्यातल्या कल्पना घरच्यांना नीट कळतील.2- कोणता मुद्दा घरच्या लोकांशी कसा बोलावा, याबद्दलची जाण विकसित होईल. 3- कधी कधी घरच्यांच्या नाही म्हणण्यामध्ये काही तथ्य असू शकतं आणि आपल्या प्लॅन्समध्ये काही निसरडय़ा जागा असू शकतात, याची कल्पना त्यांच्यामार्फत आपल्याला येऊ शकेल.4- आपल्या डोक्यातल्या आयडिया अधिक उत्तम प्रकारे राबवायला घरच्यांचीदेखील मदत होईल आणि आपल्याला त्याच विषयाचे विविध पैलू कळत जातील. त्यांचा आधारही मिळेल.