कोपेनहेगन : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेती जोडी ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांना पाचव्या मानांकित चीनच्या जोडीने बुधवारी सलग गेममध्ये पराभूत केले. त्यामुळे भारतीय जोडीचे जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. महिलांच्या एकेरीत भारताची युवा अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्हि. सिंधूने रशियाच्यां ओल्गा गोलोव्हाननोव्हाचा सरळ दोन सेटमध्ये पराभव करुन तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. ज्वाला-अश्विनी जोडीला चीनच्या किंग तियान आणि युनलेई झाओ यांनी अवघ्या ३१ मिनिटांत २१-१६, २१-८ असे पराभूत करीत तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. भारतीय जोडीला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती आणि कोर्टवर त्यांचा हा पहिला सामना होता; परंतु ज्वाला-अश्विनी हा पहिला अडथळा पार करण्यात अपयशी ठरले.जागतिक क्रमवारीत २१ व्या मानांकित भारतीय जोडीला सातव्या मानांकित चीनच्या जोडीकडून कारकीर्दीत सलग सातव्यांदा पराभवाची चव चाखावी लागली. चिनी जोडीने या वर्षी इंडिया ओपनमध्ये ज्वाला-अश्विनी यांना पराभूत केले होते. या सामन्यात भारतीय जोडीने चांगली सुरुवात करताना ३-0 अशी आघाडी घेतली; परंतु चिनी जोडीने सलग दहा गुण घेतल्यानंतर १0-३ अशी आघाडी घेतली व नंतर मागे वळून पाहिले नाही. तथापि, ज्वाला-अश्विनीने सलग सात गुण घेताना १३-१५ अशी आघाडी कमी केली होती; परंतु चिनी जोडीने हा गेम २१-१६ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये तर भारतीय जोडीने पूर्णपणे शरणागती पत्करली आणि ८-२१ असा गेम व लढतही गमावली. (वृत्तसंस्था)
विश्व बॅडमिंटन : सिंधू तिस-या, मनू, सुमीत दुस-या फेरीत
By admin | Updated: August 28, 2014 01:47 IST