लंडन : भारत ‘अ’ संघातर्फे आॅस्ट्रेलियाचा यशस्वी दौरा करणारा वेगवान गोलंदाज उमेश यादवला कोलकाता नाईट रायडर्सचे गोलंदाजी प्रशिक्षक वसीम अक्रम यांनी अचूक यॉर्कर कसा टाकायचा यासाठी मार्गदर्शन केले होते. इंग्लंडविरुद्ध वन-डे मालिकेत प्रतिस्पर्धी फलंदाजांविरुद्ध या ‘अस्त्राचा’ वापर करणार असल्याचे भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने म्हटले आहे.यादव म्हणाला, ‘यॉर्करबाबत मला अडचण भासत होती. गोलंदाजी करताना माझा चेंडू प्रतिस्पर्धी फलंदाजाच्या पायाजवळ पडत होता. वसीमने त्यासाठी योग्य मार्गदर्शन केले. यॉर्कर करताना जेथे चेंडू टाकायचा आहे त्या स्थानावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला वसीमने दिला होता. चेंडू लेग साईडला जाईल, याबाबत विचार करायचा नाही, असेही वसीमने त्यावेळी सांगितले होते.’उमेश म्हणाला, ‘यॉर्कर टाकताना शरीराची हालचाल कशी होते, यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. गोलंदाजी करणारा हात चेंडूला फॉलो करतो किंवा नाही त्याचप्रमाणे तुमचा फॉलो थ्रू कसा आहे आणि शरीर व मन याचा ताळमेळ राखणे गरजेचे आहे, असेही वसीमने सांगितले होते.’ भारत ‘अ’ संघाचे प्रतिनिधित्व करताना आॅस्ट्रेलिया दौऱ्यात उमेशला सूर गवसला. डावात ५ बळी घेतल्यानंतर आत्मविश्वास उंचावण्यास मदत झाली असून वन-डे सामन्यांच्या मालिकेत कामगिरीत सातत्य राखण्यात यश येईल, अशी आशा असल्याचे यादवने यावेळी स्पष्ट केले.यादव पुढे म्हणाला, ‘येथे चेंडू बॅटवर येण्यापूर्वी थबकतो, असा अनुभव आहे. अचूक मारा करणे गरजेचे असून उर्वरित काम चेंडूच करतो. यॉर्करचे युग संपलेले आहे, यावर माझा विश्वास नाही. माझ्या मते यॉर्कर गोलंदाजांचे महत्त्वाचे अस्त्र आहे. यॉर्कर कसा टाकायचा, याची सर्वांना माहिती असते, पण प्रत्येक गोलंदाज त्याचा वापर करू शकत नाही. ही मानसिकतेची बाब आहे. अचूक यॉर्करपेक्षा क्रिकेटमध्ये दुसरा चांगला चेंडू नाही.’ (वृत्तसंस्था)
इंग्लंडच्या फलंदाजांविरुद्ध यॉर्करचा वापर करणार : उमेश
By admin | Updated: August 27, 2014 04:05 IST