लंडन : विम्बल्डन सुरू होण्यापूर्वी गतविजेता अॅण्डी मरे आणि राफेल नदाल हे जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले खेळाडू कधी स्पर्धेबाहेर फेकले गेले हे कळलेच नाही. पुरुष गटाच्या अंतिम चार खेळाडूंमध्ये दोन खेळाडू अनुभवी आहेत आणि दोघे नवखे पण नव्या दमाचे. रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोव्हिच यांना अंतिम फेरीत स्थान पटकावण्यासाठी तरुण आणि तडफदार अशा मिलॉस राओनिक आणि ग्रिगोर दिमित्रोव यांचा अडथळा पार करावा लागणार आहे. हे दोघे नवे असले तरी त्यांचा स्पर्धेतील प्रवास मात्र थक्क करणारा आहे. या छाव्यांशी भिडण्यासाठी फेडरर व जोकोव्हिचला पुन्हा एकदा कसून अभ्यास करावा लागणार आहे.अवघ्या २४ तासांत आॅल इंग्लंड क्लबमधून अव्वल चार खेळाडूंपैकी नदाल आणि मरे यांना नवोदितांनी घरचा रस्ता दाखवला. नदालचे पॅकअप करणाऱ्या निक किर्गिओस याला उपांत्यपूर्व फेरीत मिलॉस राओनिक याच्याकडून ७-६ (७-४), २-६, ४-६, ६-७ (४-७) असा काल पराभव पत्करावा लागला. पण राओनिकने या लढतीत किर्गिओसला दिलेली झुंज ही पुढच्या फेरीत रॉजर फेडररला कडवे आव्हान देण्यासाठी सक्षम असल्याचे दिसून आले. तर दुसऱ्या लढतीत जोकोव्हिचला दिमित्रोवशी भिडावे लागेल. उपांत्यपूर्व फेरीचा विचार केल्यास फेडररसमारे स्टान वावरिंकाचे आव्हान होते आणि फेडीने पहिला सेट वगळता संपूर्ण सामन्यात वर्चस्व राखून उपांत्य फेरीत ऐटीत प्रवेश केला. जोकोच्या बाबतीत मात्र असे घडले नाही. त्याला क्रोएशियाच्या मारीन सिलीस याने चांगलेच झुंजवले. कडव्या संघर्षानंतर जोकोने उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत त्याच्यासमोर उभ्या असलेल्या दिमित्रोवने तर गतविजेत्या अॅण्डी मरेला सहज नमवले. रिओनिक आणि दिमित्रोव यांचा हाच आत्मविश्वास त्यांना फेडरर व जोेकोव्हिचसमोर कडवे आव्हान उभे करण्यासाठी पुरेसा ठरेल. (वृत्तसंस्था)
नवे आहेत, पण छावे आहेत!
By admin | Updated: July 4, 2014 04:38 IST