नवी दिल्ली : जकार्ता येथे १० ते १६ आॅगस्टदरम्यान होणाऱ्या २२ व्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालच्या नेतृत्वाखालील १८ सदस्यीय संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धेत भारताला समाधानकारक ड्रॉ मिळाला आहे.भारतीय खेळाडूंना पहिल्या फेरीत आपल्यापेक्षा कमी रॅकिंग असणाऱ्या खेळाडूंशी लढावे लागणार आहे. भारताची आघाडीची खेळाडू सायना, परुपल्ली कश्यप, किदाम्बी श्रीकांत व ज्वाला गुट्टा, अश्विनी पोनप्पा यांना सोपा ड्रॉ मिळण्याची शक्यता आहे. यामुळे हे खेळाडू उपांत्यपूर्व फेरी सहज गाठतील, अशी अपेक्षा आहे; मात्र पी. व्ही. सिंधू हिच्यासाठी मात्र सोपा ड्रा असणार नाही. उपउपांत्यफेरीत तिची गाठ चीनची आॅलिम्पिक चॅम्पियन ली जुईरुईशी पडण्याची शक्यता आहे.भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गोपीचंद यांनी भारतीय खेळाडूंसाठी सोपा ड्रॉ असला तरी यात संघर्षपूर्ण सामने होऊ शकतात. त्यामुळे खूप उत्साहित होण्याची गरज नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, ही जागतिक स्पर्धा आहे. त्यामुळे कोणताही ड्रॉ सोपा नसतो, असे माझे मत आहे; मात्र आम्ही आव्हानांसाठी तयार आहोत.भारताची सायना नेहवाल पाच वेळा जागतिक चॅम्पियन स्पर्धेत सहभागी झाली आहे; मात्र ती एकदाही उपउपांत्य फेरीच्या पुढे गेली नाही. सायनाला या स्पर्धेत दुसरे मानांकन देण्यात आले आहे. सायना आणि सिंधूला स्पर्धेत पहिल्या फेरीत बाय मिळाला आहे. गतविजेती स्पेनची कॅरोलीन मारीनला प्रथम मानांकन देण्यात आले आहे.भारताला सायनाकडून पदकाची अपेक्षा आहे. सायनाची या वर्षातील कामगिरी समाधानकारक आहे. तिने ‘इंडिया ग्रां.प्री. गोल्ड इंडिया ओपन सुपर सीरिज’मध्ये विजेतेपद पटकावले आहे. सिंधूने २०१३ व २०१४ मध्ये येथे कांस्यपदक पटकावले आहे. तिला ११वे मानांकन देण्यात आले आहे.(वृत्तसंस्था)
भारताला समाधानकारक ड्रॉ
By admin | Updated: July 30, 2015 01:12 IST