नवी दिल्ली : आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीचा तपास करण्यासाठी स्थापन झालेल्या न्या. मुकुल मुद्गल यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाला शुक्रवारी सोपविला.समितीच्यावतीने एका ज्येष्ठ वकिलाने सीलबंद लिफाफ्यात हा अहवाल न्यायालयाच्या स्वाधीन केला. पुढील सुनावणी १ सप्टेंबर रोजी होईल. तपासकर्त्यांची बैठक बुधवारी आणि गुरुवारी चेन्नई येथे पार पडली. टीम इंडियातील खेळाडूंशी संवाद साधण्यासाठी विदेशात जाण्याचा आपला कुठलाही हेतू नसल्याचे समितीने २० आॅगस्ट रोजी स्पष्ट केले होते. टीम इंडिया सध्या इंग्लंडमध्ये मालिका खेळत आहे. या दरम्यान खेळाडूंचा तपास केला तर त्यांची एकाग्रता भंग होऊ शकते, असे समितीचे मत होते.२०१३ च्या आयपीएलदरम्यान दल्ली पोलिसांनी स्पॉट फिक्सिंगच्या आरोपात राजस्थान रॉयल्सचे तीन खेळाडू अंकित चव्हाण, श्रीसंत आणि अजित चंदीला यांना अटक केली होती. यानंतर मुंबई पोलिसांनी बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवास यांचे जावई मयप्पन तसेच अभिनेता बिंदू दारासिंग यांना सट्टेबाजीच्या आरोपात अडक केली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आॅक्टोबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने न्या. मुुकुल मुद्गल यांच्या मार्गदर्शनात तीन सदस्यीय समिती नेमली. न्या. तिरथसिंग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील पीठाला आज हा अहवाल सोपविताच खंडपीठाने पुढील सुनावणीची १ सप्टेंबर निश्चित केली. मुद्गल समितीने याआधी देखील या प्रकरणाशी निगडित काही तथ्य सीलबंद लिफाफ्यात न्यायालयाला सोपविले होते. (वृत्तसंस्था)
मुद्गल समितीचा अंतरिम अहवाल सादर
By admin | Updated: August 30, 2014 04:01 IST