नवी दिल्ली : आयपीएल २०१३च्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आरोपातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतरही माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत आणि फिरकीपटू अंकित चव्हाण यांच्यावरील आजन्म बंदी मागे घेण्याबाबत पुनर्विचार करणार नसल्याचे बीसीसीआयने बुधवारी स्पष्ट केले. श्रीसंत, चव्हाण आणि अजित चंदिला यांच्यासह ३६ आरोपींना मागच्या आठवड्यात पतियाळा हाऊस कोर्टाने सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केले होते. बीसीसीआयने मात्र त्यांच्यावरील बंदी मागे घेण्यास ठाम नकार दिला आहे. श्रीसंतला पुन्हा क्रिकेट खेळण्याची परवानगी बहाल करण्याची विनंती केरळ राज्य संघटनेकडे केल्यानंतर बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी दोन्ही खेळाडूंवरील आजन्म बंदीचा पुनर्विचार होणार नसल्याचे सांगितले. या दोघांविरुद्ध शिस्तपालनाची कारवाई झाली. भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या अहवालावर आधारित ही कारवाई असल्याने दोघांवरही आजन्म बंदीचा पुनर्विचार करण्याची शक्यता नसल्याचे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने घातलेली बंदी कायम राहील. शिस्तपालन कारवाई आणि कायदेशीर कारवाई वेगवेगळी असते. - अनुराग ठाकूर
श्रीसंत, चव्हाणवरील बंदी कायम
By admin | Updated: July 30, 2015 01:12 IST