क्रीडा : विजेदर
By admin | Updated: August 26, 2014 21:56 IST
विजेंदरची आशियाई स्पर्धेतून माघार
क्रीडा : विजेदर
विजेंदरची आशियाई स्पर्धेतून माघार नवी दिल्ली : ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक मिळविणारा भारतीय बॉक्सर विजेंदर सिंह याने हाताला झालेल्या दुखापतीमुळे इंचियोन येथे सप्टेंबरमध्ये होणार्या आशियाई स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे़ राष्ट्रकुल स्पर्धेत ७५ किलो वजन गटातील लढतीत विजेंदरच्या हाताला दुखापत झाली होती़ या दुखापतीतून तो अद्यापही सावरलेला नाही़ त्यामुळे त्याला आगामी आशियाई स्पर्धेला मुकावे लागणार आहे़ विजेंदर म्हणाला, आशियाई स्पर्धेपर्यंत दुखापत बरी होईल असे वाटत होते़ त्यामुळे मी सरावही करीत होतो; मात्र तपासणीदरम्यान दुखापत अद्यापही बरी झाली नसल्याचे आढळून आले़ त्यामुळे डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे़ ही दुखापत बरी होण्यासाठी आणखी किती वेळ लागेल हे सांगणे कठीण असल्याचे तो म्हणाला़आशियाई स्पर्धेतून विजेंदरने माघार घेतल्यामुळे भारताच्या पदकांच्या आशेला धक्का पोहोचला आहे़ नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय मुष्टियोद्ध्यांनी तीन रौप्यपदकांची कमाई केली होती़ त्याआधी २०१० मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी बॉक्सिंगमध्ये ७ पदकांवर नाव कोरले होते़ त्यामध्ये विजेंदर आणि विकास कृष्ण (६० किलो वजन गट) यांच्या सुवर्णपदकांचा समावेश होता़ (वृत्तसंस्था)