नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय आॅलिम्पिक संघटनेने पाठविलेल्या ९४२ जणांच्या लांबलचक यादीला कात्री लावताना केंद्र सरकारने मंगळवारी केवळ ६७९ जणांच्या यादीवर अंतिम मोहोर उमटविली. यामुळे भारतीय पथकाच्या सहभागाविषयी असलेल्या शंकेचे निरसन झाले आहे.द. कोरियातील इंचियोन येथे १९ सप्टेंबर ते ४ आॅक्टोबर या कालावधीत स्पर्धेचे आयोजन होईल. आयओएने सरकारकडे ६६२ खेळाडू आणि २८० अधिकाऱ्यांची यादी पाठविली होती. यावर क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेशी चर्चा केल्यानंतर सरकारने ५१६ खेळाडू आणि १६३ कोचेसच्या यादीला मंजुरी प्रदान केली. साईने याआधी पात्रता अटीअंतर्गत खेळाडू पाठविले जातील असे सांगितले होते. यानुसार वैयक्तिक स्पर्धेत खेळाडू पहिल्या सहा स्थानांत असावेत आणि सांघिक गटात संघ पहिल्या आठमध्ये असावेत अशी अट होती. हा निकष लागू करण्यात आला असता तर फुटबॉल, टेबल टेनिस, हॅण्डबॉल, बास्केटबॉल आणि सेपक टॅकरॉ या संघांना आशियाई स्पर्धेत सहभागी होता आले नसते. या खेळातून माघारीचा अर्थ असा की आशियाई आॅलिम्पिक परिषदेने दिलेल्या धमकीनुसार मोठा आर्थिक भुर्दंड देखील भरावा लागला असता. (वृत्तसंस्था)