कोपेनहेगन : भारताच्या सायना नेहवाल आणि पी. व्हि. सिंधू यांनी विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये महिला एकेरीत उपांत्यपूर्व फेरीतील आपली जागा निश्चित केली. सायनाने एक तास ५ मिनिटे रंगलेल्या लढतीत १३ व्या मानांकित जपानच्या सयाका ताकाहाशीविरुद्ध संघर्षपूर्ण लढतीत १४-२१, २१-१८, २१-१२ गुणांनी विजय मिळविला. सायनाला उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली आॅलिम्पिक चॅम्पियन चीनच्या जुईरुई लीच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. लीने उपउपांत्यपूर्व फेरीत १२ वे मानांकन प्राप्त ली हानचा केवळ २७ मिनिटांमध्ये २१-९, २१-१७ ने धुव्वा उडविला. सायनाची कारकीर्दीमध्ये जुईरुईविरुद्ध २-७ अशी कामगिरी आहे. उभय खेळाडूंदरम्यान यंदा इंडोनेशिया ओपनमध्ये लढत झाली होती. त्यात चीनच्या खेळाडूने सलग गेम्समध्य बाजी मारली होती. सायनाने जुईरुईविरुद्ध अखेरचा विजय २०१२ मध्ये इंडोनेशिया ओपनमध्ये मिळविला होता. सायनाने २०१० मध्ये सिंगापूर ओपनमध्ये जुईरुईचा पराभव केला होता, पण त्यावेळी सायनाला अव्वल मानांकन होते तर जुईरुई बिगरमानांकित होती. सिंधूने कोरियाच्या यिओन जू बेईचा एक तास १६ मिनिटे चाललेल्या लढतीत १९-२१, २२-२०, २५-२३ असा फडशा पाडला. उपांत्यपूर्व फेरीत सिंधुला दुसरी मानांकित चीनच्या सि जियान वांगला सामोरे जावे लागणार आहे. (वृत्तसंस्था)
सायना, सिंधू उपांत्यपूर्व फेरीत
By admin | Updated: August 29, 2014 01:24 IST