नवी दिल्ली : आगामी विश्व चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडूंना अनेक पदके जिंकण्याची सर्वोत्तम संधी आहे, अशी प्रतिक्रिया भारताचे मुख्य बॅडमिंटन प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी दिली आहे. इंडोनेशियातील जकार्तामध्ये १० ते १६ आॅगस्ट या कालावधीत आयोजित स्पर्धेत प्रथमच जागतिक क्रमवारीत दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर असलेले खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. सायना नेहवाल महिला एकेरीमध्ये जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे तर पुरुष एकेरीमध्ये किदांबी श्रीकांतला तिसरे मानांकन आहे. गोपीचंद पुढे म्हणाले,‘स्पर्धेसाठी सराव शिबिर चांगले सुरू आहे. आपल्याकडे पारुपल्ली कश्यप, श्रीकांत, पी.व्ही. सिंधू, एचएस प्रणय आदी दिग्गज खेळाडू आहे. प्रणय दुखापतीतून सावरत असून त्याच्या प्रगतीबाबत मी समाधानी आहे. तो निश्चितच या स्पर्धेत सहभागी होणार आहे.’ राष्ट्रकुल स्पर्धेतील चॅम्पियन कश्यपच्या कामगिरीमध्ये चढ-उतार अनुभवाला मिळाले. त्याने जून महिन्यात इंडोनेशियामध्ये गेल्या स्पर्धेत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानवर असलेल्या चीनच्या चेन लोंगचा पराभव केला होता. कश्यपबाबत बोलताना गोपीचंद म्हणाले,‘माझ्या मते कश्यपची शरीरयष्टी बघितल्यानंतर त्याच्यासाठी नेहमी आव्हान ठरते. त्याला अस्थामाचा त्रास आहे, पण कोर्टवर तो अधिक प्रयत्न करीत असल्याचे दिसून येतो. कश्यप सध्या सर्वोत्तम बॅडमिंटन खेळत आहे.’ यंदाच्या मोसमात दुखापतीमुळे त्रस्त असलेली आणि विश्व चॅम्पियनशिपमध्ये दोनदा कांस्यपदकाची मानकरी ठरलेल्या सिंधूबाबत बोलताना गोपीचंद म्हणाले,‘तीन महिन्यांच्या ब्रेकनंतर तिच्याकडून सातत्याने चमकदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त करता येणार नाही. तिला थोडा वेळ मिळणे अपेक्षित आहे.’ श्रीकांतने यंदाच्या मोसमात शानदार सुरुवात केली, पण दुखापतीनंतर पुनरागमन करताना आॅस्ट्रेलिया, इंडोनेशिया आणि ताईपेई येथे झालेल्या स्पर्धामध्ये त्याला दुसऱ्या फेरीचा अडथळा पार करता आलेला नाही. श्रीकांत परिस्थितीसोबत लवकरच जुळवून घेण्यात यशस्वी ठरेल, अशी आशा असल्याचे गोपीचंद यावेळी म्हणाले. (वृत्तसंस्था)
विश्व चॅम्पियनशिपमध्ये पदक पटकावण्याची संधी : गोपीचंद
By admin | Updated: July 27, 2015 00:01 IST