नेपियर : कामगिरीत सातत्य राखताना न्यूझीलंडने रविवारी खेळल्या गेलेल्या ‘अ’ गटाच्या लढतीत अफगाणिस्तानचा ६ गडी राखून पराभव केला आणि विश्वकप स्पर्धेत सलग पाचवा विजय नोंदवला.अफगाणिस्तानने दिलेले १८७ धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने १३.५ षटके व ४ गडी राखून पूर्ण केले. न्यूझीलंडतर्फे मार्टिन गुप्तीलने सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली. त्याआधी नजीबुल्लाह जादरान (५६) व शमीउल्ला शेनवारी (५४) यांच्या उल्लेखनीय योगदानानंतरही अफगाणिस्तानचा डाव ४७.४ षटकांत १८६ धावांत संपुष्टात आला. न्यूझीलंडतर्फे अनुभवी फिरकीपटू डॅनियल व्हेटोरीने १८ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेत अफगाणिस्तानचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, व्हेटोरीने वन-डे क्रिकेट कारकीर्दीत ३०० बळींचा टप्पा गाठला. वेगवान गोलंदाज ट्रेन्ट बोल्टने ३४ धावांच्या मोबदल्यात ३ तर कोरी अँडरसनने ३८ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेत व्हेटोरीला योग्य साथ दिली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या अफगाणिस्तान संघाची ६ बाद ५९ अशी नाजूक अवस्था झाली होती. त्यानंतर जादरान व शेनवारी यांनी संयमी खेळी करीत संघाचा डाव सावरला. फॉर्मात असलेल्या न्यूझीलंड संघासाठी हे आव्हान मोठे नव्हते. कर्णधार ब्रॅन्डन मॅक्युलमने आक्रमक सुरुवात करताना १८ चेंडूंमध्ये ४२ धावा फटकाविल्या. त्यात सहा चौकार व एका षटकाराचा समावेश आहे. मॅक्युलम बाद झाल्यानंतर धावगती मंदावली असली तरी संघाला लक्ष्य गाठण्यात अडचण भासली नाही. केन विलियम्सन (३३) आणि गुप्तील यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली. गुप्तील धावबाद झाल्यामुळे ही भागीदारी संपुष्टात आली. त्यानंतर रॉस टेलरने (नाबाद २४) कोरी अँडरसनच्या (नाबाद ७) साथीने विजयावर शिक्कामोर्तब केले. (वृत्तसंस्था)
न्यूझीलंडचा विजयी पंचकार
By admin | Updated: March 9, 2015 09:34 IST