ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - टी - २० मालिकेत भारताच्या लाजीरवाण्या पराभवानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. निवड समितीने कर्णधारपदासोबतच धोनीच्या संघातील स्थानाबाबतही पुनर्विचार करण्याची गरज आहे असे मत भारताचा माजी गोलंदाज अजित आगरकरने मांडले आहे.
एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित आगरकरने महेंद्र सिंह धोनीविषयी भाष्य केले. आगरकर म्हणतो, धोनी हा भारताचा चांगला खेळाडू आहे. पण त्याचा ढासळता फॉर्म ही चिंतेची बाब आहे. त्याने चांगली खेळी करणे अपेक्षीत आहे. भूतकाळात त्याने चांगली कामगिरी केली आहे म्हणून तो आता अपयशी ठरला तरी चालेल ही भूमिका चालणार नाही. निवड समितीने विराट कोहलीची कसोटी संघाचा कर्णधार म्हणून कामगिरी व धोनीची वन डे संघाचा कर्णधार म्हणून केलेली कामगिरी याचा तुलनात्मक अभ्यास करुन कठोर निर्णय घेण्याची वेळ आले आहे असे त्याने म्हटले आहे.