ऑनलाइन लोकमत
अॅडलेड, दि. ९ - महमदुल्लाहचे शानदार शतक (१०३) आणि मुशफिकर रहीमच्या ८९ धावांच्या जोरावर बांगलादेशने इंग्लंडसमोर जिंकण्यासाठी २७६ धावांचे आव्हान ठेवले आहे. डावाची अडखळती सुरूवात झालेल्या बांगलादेशने ५० षटकांत ७ गडी गमावत २७५ धावा केल्या.
विश्वचषक स्पर्धेत आव्हान कायम राखण्यासाठी संघर्ष करणा-या इंग्लंडने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जेम्स अँडरसनने पहिले २ बळी टिपत तो निर्णय सार्थही ठरवला. धावांचे शतकही पूर्ण झालेले नसताना बांगलादेशने ४ गडी गमावले होते व त्यांची स्थिती बिकट झाली होती. तमीम इक्बाल (२) व इमरुल केयस (२) लवकर बाद झाल्यानंतर सौम्य सरकार (४०) व महमदुल्लाहने डाव सावरला. मात्र त्यानंतर सरकार व शाकीब अल हसन (२) हे दोघेही तंबूत परतले. मात्र महमदुल्लाने मुशफिकर रहीम (८९) सोबत चांगली धावसंख्या उभारली. १०३ धावांवर असताना महमदुल्लाह धावबाद झाला मात्र त्यानंतरही मुशफिकरने चांगली खेळी करत बांगलादेशला पावणेतीनशे धावांचा टप्पा गाठून दिला. दरम्यान शाकिब अल हसन (२) व सब्बीर रहमान (१४) हेही तंबूत परतल्याने मुशफिकरने एकहाती डाव सावरला व ८९ धावांवर असताना ब्रॉडच्या चेंडूवर तो बाद झाला. ५० षटके पूर्ण होताना बांगलादेशतर्फे मश्रफे मुर्तझा (६) व अराफत सनी (३) खेळत होते. इंग्लंडतर्फे अँडरसन व जॉर्डनने २ तर ब्रॉड व अलीने प्रत्येकी १ बळी टिपला.
‘अ’ गटात आव्हान कायम राखण्यासाठी संघर्ष करणा-या इंग्लंड आणि थोडेसे परिश्रम व थोडी नशीबाची साथ मिळाल्यामुळे ६ गुणासह तिस-या क्रमांकावर असलेला बांगलादेश यांच्यातील ही महत्वपूर्ण लढत आहे. इंग्लंडचे चार सामन्यांमध्ये २ गुण झाले असून आज जर त्यांनी विजय मिळवला तर त्यांचे ४ गुण होतील. त्यांचा शेवटचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध होणार असून तो जिंकण्यात त्यांना अडचण येणार नाही व ६ गुणांसह ते बाद फेरीत जातील. मात्र आजचा सामना गमावल्यास इंग्लंडचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.
बांगलादेशने आजचा सामना जिंकल्यास त्यांचे ५ सामन्यात ७ गुण होतील. त्यांची पुढील लढत न्यूझीलंडविरुद्ध असून तो सामना जिंकण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकल्यास ७ गुण मिळून ते बाद फेरीत जाण्यास सज्ज असतील. मात्र तर बांगलादेशने आजचा सामना गमावल्यास त्यांना न्युझीलंडविरुद्ध विजय मिळवावा लागेल, जे सद्य स्थितीत अशक्यप्राय वाटते.