हरारे : कर्णधार ग्रॅमी क्रेमर (नाबाद १०२) याने कारकिर्दीतील पहिले शतक झळकविले. या शतकाच्या जोरावर झिम्बाब्वेने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात फॉलोआॅनची नामुष्की टाळण्यात यश मिळवले. श्रीलंकेच्या पहिल्या डावात ५३७ धावसंख्येच्या प्रत्युत्तरात खेळताना झिम्बाब्वेने ३७३ धावांची मजल मारली. श्रीलंकेने पहिल्या डावात १६४ धावांची आघाडी घेतली. क्रेमरने १४ वा कसोटी सामना खेळताना प्रथमच शतक झळकावले. क्रेमरने २०७ चेंडूंना सामोरे जाताना १० चौकारांच्या साह्याने नाबाद १०२ धावा फटकावल्या. क्रेमरला यष्टिरक्षक पीटर मूर (७९) व डोनाल्ड तिरिपानो (४६) यांची योग्य साथ लाभली. एकवेळ झिम्बाब्वेची ६ बाद १३९ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर क्रेमरने मूरसोबत सातव्या विकेटसाठी १३२ धावांची भागीदारी केली. क्रेमरने त्यानंतर तिरिपानोसोबत आठव्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी केली. मूरने ८४ चेंडूंंना सामोरे जाताना ६ चौकार व ३ षटकार ठोकले, तर तिरिपानोने ९२ चेंडूंच्या खेळीत ७ चौकार लगावले. श्रीलंकेतर्फे सुरंगा लकमलने ६९ धावांत ३, कर्णधार व डावखुरा फिरकीपटू रंगना हेरातने ९७ धावांत ३ तर दिलरुवान परेराने ६६ धावांत २ बळी घेतले. श्रीलंका संघाने तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात बिनबाद ५ धावा केल्या होत्या. श्रीलंका संघाकडे एकूण १६९ धावांची आघाडी आहे.
क्रेमरचे शतक, झिम्बाब्वेने फॉलोआॅन टाळला
By admin | Updated: November 1, 2016 02:03 IST