टेनिस दुहेरीच्या अव्वल शंभरात राजा नवी दिल्ली : कोलंबियातील बगोटा येथे अलीकडेच संपलेल्या क्लारो ओपन स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारणार भारताचा दुहेरीतील टेनिसपटू पुरव राजाला एटीपी दुहेरीच्या मानांकनामध्ये पुन्हा एकदा अव्वल १०० मध्ये स्थान मिळाले आहे तर लिएंडर पेस आणि रोहन बोपन्ना यांनी मानांकनामधील आपले स्थान कायम राखले आहे.राजाने फ्रान्सच्या फॅब्राइस मार्टिनच्या साथीने उपांत्य फेरीत स्थान मिळवले होते. त्याने १३ स्थानांची प्रगती करताना ८९ व्या स्थानावर झेप घेतली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यानंतर त्याचे हे सर्वोत्तम मानांकन आहे. दुहेरीमध्ये बोपन्ना भारताचा सर्वोत्तम मानांकन असलेला खेळाडू आहे. तो दहाव्या स्थानी कायम आहे तर पेस ३२ व्या स्थानी आहे. डब्ल्यूटीए दुहेरी मानांकनामध्ये सानिया मिर्झा ९५१० मानांकन गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे. एटीपी एकेरीच्या मानांकनामध्ये सोमदेव देववर्मन भारताचा अव्वल खेळाडू आहे. त्याने एका स्थानाने प्रगती केली असून तो १४७ व्या स्थानावर आहे तर न्यूझीलंडविरुद्ध डेव्हिस कप स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा युकी भांबरी १५१ व्या स्थानी कायम आहे. अव्वल २०० खेळाडूंमध्ये समावेश असलेला तिसरा भारतीय खेळाडू साकेत मयनेनीची पाच स्थानांनी घसरण झाली असून तो १९९ व्या स्थानी आहे. (वृत्तसंस्था)
टेनिस दुहेरीच्या अव्वल शंभरात राजा
By admin | Updated: July 28, 2015 02:07 IST