चंढीगड/नवी दिल्ली : मिसाईलमॅन एपीजे अब्दुल कलाम यांना क्रीडा जगतातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. एका महान व दूरदृष्टी असलेल्या शास्त्राज्ञाला देश मुकला अशा शब्दांत त्यांचा गौरव करण्यात आला. प्रसिद्ध धावक मिल्खा सिंग व बलबिर सिंग यांनी युवकांमध्ये प्रेरणा निर्माण करणारा व दूरदृष्टी असलेले शास्त्रज्ञ म्हणून त्यांचा गौरव केला आहे. तसेच त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरुन काढणे अवघड असल्याचे ते म्हणाले. मिल्खा सिंग म्हणाले, एका सामान्य परिवारात जन्मलेला एक व्यक्ती देशाच्या राष्ट्रपतीपदासारख्या सर्वोच्च पदावर विराजमान झाला. त्यांनी आपल्या कतृत्वाने जनतेच्या हृदयात आपले एक विशेष स्थान निर्माण केले होते. ते खऱ्या अर्थाने ेदशाचे अनमोल रत्न होते. कलाम यांच्या निधनाने देशाची फार मोठी हानी झालेली आहे. त्यांच्या प्रेरणादायी शब्द अजूनही कानात घुमत आहेत. त्यांचे भाषणामुळे रात्रीची झोप देखील लागत नसे, इतकी ताकद त्यांच्या बोलण्यात होती, अशी शब्दांत बलबिर सिंह यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. एक महान वैज्ञानिक, सर्वांचे प्रेरणास्त्रोत व एक महान व्यक्तीला देश मुकल्याची भावना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने याने टष्ट्वीटरवरुन व्यक्त केली.जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मृत्यू अटळ आहे. मात्र तो जीवनात काय काम करतो हे महत्त्वाचे असते. वैज्ञानिक क्षेत्रात अतुलनीय काम करण्याबरोबरच त्यांनी युवकांना प्रेरणा देण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. एका सर्वोच्च पदावर राहूनही सामन्य जीवन व्यतीत करणारे व्यक्ती म्हणून ते जनतेच्या मनात कायम राहतील अशा शब्दांत माजी कर्णधार सौरव गांगुली याने श्रद्धांजली अर्पण केली. (वृत्तसंस्था)