नवी दिल्ली : मलेशियात आयोजित सुल्तान जोहोर कप हॉकी स्पर्धेसाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) ज्युनियर पुरुष हॉकी संघाला परवानगी दिली आहे. यामुळे भारताच्या सहभागावरून सुरू असलेली अनिश्चितता संपुष्टात आली. जोहोर कप हॉकीचे आयोजन बाहरू येथे १0 ते २0 ऑक्टोबर या कालावधीत होईल. भारत या स्पर्धेचा गतविजेता आहे, हे विशेष. २७ दिवसांचे तयारी शिबिर १३ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबरदरम्यान मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियममध्ये होईल. त्यात ३३ खेळाडू आणि १0 अधिकार्यांचा सहभाग असेल. साईने ५ सप्टेंबर रोजी हॉकी इंडियाला लिहिलेल्या पत्रात ४३ जणांच्या तयारी शिबिरास मान्यता देण्यात आल्याचा खुलासा केला. सुल्तान जोहोर कप हॉकी स्पर्धा एफआयएच ज्युनियर विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे. शिबिरासाठी परवानगी मिळत नसल्याने क्रीडा मंत्रालय आणि साईला धारेवर धरणारे हॉकी इंडियाचे महासचिव नरिंदर बत्रा म्हणाले,'साईचे फार फार आभार!' शिबिराचे आयोजन हॉकी इंडियाचे हायपरफॉर्मन्स मॅनेजर रोलॅन्ड ओल्समन्स यांच्या मार्गदर्शनात होणार आहे. भारतासह ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, पाक, न्यूझिलंड आणि मलेशिया हे संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत. (वृत्तसंस्था)
ज्युनियर हॉकी संघाला साईचा हिरवा कंदील
By admin | Updated: September 9, 2014 03:32 IST