अहमदाबाद : मायकल हसी व लेंडल सिमन्सच्या शतकी सलामीनंतर फिरकीपटूंच्या अचूक मार्याच्या जोरावर गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या सातव्या पर्वात सोमवारी खेळल्या गेलेल्या लढतीत राजस्थान रॉयल्सचा २५ धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्सने ३ बाद १७८ धावांची आव्हानात्मक मजल मारली आणि प्रतिस्पर्धी राजस्थान रॉयल्सचा डाव ८ बाद १५३ धावांत रोखला. या महत्त्वाच्या सामन्यात अजिंक्य रहाणे, स्टिव्हन स्मिथ आणि प्रवीण तांबे या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय राजस्थान रॉयल्स संघाच्या अंगलट आला. लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली. करण नायरने (४८ धावा, २४ चेंडू, ४ चौकार, ३ षटकार) दमदार खेळी केली; पण त्याला दुसर्या टोकाकडून अपेक्षित साथ लाभली नाही. ब्रॅड हॉज (४०) आणि जेम्स फॉकनर (नाबाद ३०) यांनी आठव्या विकेटसाठी ६९ धावांची केलेली भागीदारी पराभवातील अंतर कमी करणारी ठरली. रॉयल्सचा डाव ८ बाद १५३ धावसंख्येवर रोखला गेला. मुंबई इंडियन्सतर्फे फिरकीपटू हरभजन सिंग व श्रेयास गोपाल यांनी अनुक्रमे १३ व २५ धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी २ बळी घेतले. प्रग्यान ओझाने ३० धावांच्या मोबदल्यात २ फलंदाजांना तंबूचा मार्ग दाखवीत मुंबई इंडियन्सच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. रॉयल्स संघासाठी ही लढत महत्त्वाची होती. रॉयल्स संघ १४ गुणांसह गुणतालिकेत तिसर्या स्थानावर कायम आहे, पण १२ सामन्यांतील हा त्यांचा पाचवा पराभव आहे. मुंबई संघाने ११ सामने खेळताना चौथा विजय मिळविला. मुंबई संघाच्या खात्यावर ८ गुणांची नोंद असून, जर-तरच्या समीकरणावर त्यांना प्लेआॅफ फेरी गाठण्याची धूसर आशा आहे. त्याआधी, मायकल हसी व लेंडल सिमन्स यांच्या शतकी सलामीनंतर कर्णधार रोहित शर्माने डेथ ओव्हर्समध्ये केलेल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने ३ बाद १७८ धावांची आव्हानात्मक मजल मारली. सिमन्सने ५१ चेंडूंना सामोरे जाताना ६२ धावा फटकाविल्या, तर हसीने ३९ चेंडूंमध्ये ५६ धावांची खेळी केली. या दोघांनी सलामीला १२० धावांची भागीदारी करीत मुंबई इंडियन्सला चांगली सुरुवात करून दिली. रोहित शर्माने १९ चेंडूंमध्ये ३ चौकार व ४ षटकारांच्या साहाय्याने ४० धावा फटकाविल्या. मुंबई इंडियन्सने अखेरच्या ५ षटकांमध्ये ५६ धावा वसूल केल्या. राजस्थान रॉयल्सतर्फे फिरकीपटू अंकित शर्मा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने २३ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. (वृत्तसंस्था)
आशा अजून जिवंत
By admin | Updated: May 20, 2014 00:33 IST