अहमदाबाद : अंजिक्य रहाणेसह आघाडीच्या फलंदाजांनी दिलेल्या उपयुक्त योगदानानंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक मार्याच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने गुरुवारी खेळल्या गेलेल्या लढतीत दिल्ली डेअरडेव्हिल्सचा ६२ धावांनी पराभव केला आणि आयपीएलच्या सातव्या पर्वात सातवा विजय नोंदविला. दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाला पराभवाची मालिका खंडित करण्यात अपयश आले. राजस्थान रॉयल्सने २० षटकांत ६ बाद २०१ धावांची दमदार मजल मारली आणि लक्ष्याचा पाठलाग करणार्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचा डाव २० षटकांत ९ बाद १३९ धावांत गुंडाळला. दिल्ली डेअरडेव्हिल्सतर्फे मनोज तिवारी (नाबाद ६१ धावा, ४४ चेंडू, ५ चौकार, २ षटकार), मयंक अग्रवाल (१७) ,राहुल शुक्ला (१४) आणि कर्णधार केविन पीटरसन (१३) यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांना दुहेरी धावसंख्या नोंदविण्यात अपयश आले. राजस्थान रॉयल्सतर्फे रजत भाटियाने १८ धावांत २ बळी घेतले, तर त्याला धवल कुलकर्णी (१-२४), कटिंग (१-३१), फॉकनर (१-६), कूपर (१-१९), तांबे (१-२४) आणि स्टुअर्ट बिन्नी (१-१४) यांनी योग्य साथ दिली. त्याआधी, सलामीवीर अजिंक्य रहाणेची अर्धशतकी खेळी व अन्य फलंदाजांनी दिलेल्या उपयुक्त योगदानाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने ६ बाद २०१ धावांची दमदार मजल मारली. रहाणेने ५० चेंडूंना सामोरे जाताना ८ चौकार व एका षटकाराच्या साह्याने ६४ धावांची खेळी केली. पिंच हिटर केव्हिन कूपरने १६ चेंडूंमध्ये ३२ धावा फटकाविल्या. संजू सॅम्सन (४० धावा, २५ चेंडू, ३ षटकार) आणि जेम्स फॉकनर (नाबाद २३ धावा, ८ चेंडू) यांचेही योगदान उल्लेखनीय ठरले. (वृत्तसंस्था)
राजस्थानचा दिमाखदार विजय
By admin | Updated: May 16, 2014 05:27 IST