नवी दिल्ली : भारतीय कुस्तीचा महानायक बनलेला राष्ट्रकुल सुवर्णविजेता मल्ल सुशीलकुमारसह अन्य पदकविजेत्या मल्लांचे मायदेशात जल्लोषात स्वागत करण्यात आले. येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर चाहत्यांच्या स्वागताचा स्वीकार केल्यानंतर अभिवादन करीत सुशील म्हणाला, ‘आता सप्टेंबरमध्ये आयोजित आशियाड, तसेच विश्व चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकण्याचा निर्धार मनात आहे.’
सुशील हा गुरू महाबली सतपाल यांच्यासोबत पहाटे येथे दाखल झाला. अन्य मल्ल योगेश्वर दत्त, अमित कुमार, बजरंग, पवन, राजीव तोमर, सत्यव्रत कादयान, तसेच सात महिला मल्ल, कोच व अधिकारी पहाटे दाखल झाले. 14 पैकी पाच सुवर्ण आणि 13 रौप्य जिंकणा:या मल्लांच्या स्वागतासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेतही ढोलताशांचा गजर झाला.
सतपाल यांच्या छत्रसाल स्टेडियममधील द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त कोच व अन्य मल्ल, पदकविजेत्या मल्लांच्या गावातील चाहते हजारोच्या संख्येने विमानतळाबाहेर जमले होते. आपल्या लाडक्या नायकांच्या स्वागतासाठी कुणी हारतुरे, तर कुणी पगडी आणि कुणी तोंड गोड करण्यासाठी मिठाई आणली होती. मल्लांच्या या स्वागत सोहळ्याने बीजिंग ऑलिम्पिक, विश्व चॅम्पियन, तसेच लंडन ऑलिम्पिकनंतर झालेल्या सोहळ्याच्या आठवणींना उजाळा मिळाला. सुशील आणि सतपाल यांना पहाटे 2.3क् वाजताच्या सुमारास विमानतळाबाहेर आले. दोघेही बाहेर येताच चाहत्यांनी पुष्प आणि हारांचा वर्षाव सुरू केला. सोबतीला सुशील जिंदाबाद.. अशा गगनभेदी घोषणाही होत्या. सुशीलवर गुलाब पाकळ्यांचा किमान 15 मिनिटे वर्षाव होत राहिला.
विमानतळ परिसरात या वेळी खच्चून गर्दी होती. प्रत्येक जण मल्लांची एक झलक पाहण्यास आणि त्यांना हारतुरे घालण्यासाठी आसुसलेले होते. मीडियातील लोकांचीही मोठय़ा संख्येने गर्दी होती. छायाचित्रकारांचे फ्लॅश तर चमकत होतेच, पण उपस्थितांनी या वेळी आपल्या मोबाईलमध्ये या ऐतिहासिक क्षणांच्या स्मृती टिपल्या.
चाहत्यांच्या हातात जे बॅनर्स होते, त्यावर प्रत्येक मल्लांचे नाव आणि अभिनंदन असे ठळकपणो लिहिले होते. कोच रामफल मान यांनी योगेश्वर जिंदाबादच्या घोषात आपल्या शिष्याला चक्क डोक्यावर घेतले. आंतरराष्ट्रीय मल्ल प्रवीण राणा, राहुल मान, सोनू आणि अमित, कृष्ण कुमार हे ज्युनियर्स आपल्या सिनियर्सचे कौतुक करण्यासाठी आले होते. नंतर या मल्लांना एका गाडीतून छत्रसाल स्टेडियममध्ये आणण्यात आले. तेथेही ढोलताशे आणि नृत्यांच्या आनंदात या मल्लांना भेटणा:यांनी एकच गर्दी केली होती. सर्वच मल्लांना गळाभर हार, मिठाई आणि अभिनंदनाचा वर्षाव लाभल्याने सर्वत्र देशभक्तिमय वातावरण निर्माण झाले. (वृत्तसंस्था)