नवी दिल्ली : आयपीएलच्या सहाव्या पर्वात स्पॉट फिक्सिंगचे डाग लागलेल्या तीन क्रिकेटपटूंवर विठूकृपा झाली. शांताकुमारन श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंडीला यांची सबळ पुराव्यांअभावी येथील पतियाळा हाउस कोर्टाने शनिवारी निर्दोष सुटका केली. कोर्टाच्या निर्णयानंतर तिघांच्याही डोळ्यांत अश्रू तरळले.तिघेही राजस्थान रॉयल्सचे सदस्य होते. आयपीएलच्या सहाव्या सत्रामध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याच्या आरोपावरून मे २०१३मध्ये त्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली; नंतर त्यांची जामिनावर मुक्तता झाली होती. दिल्ली पोलीस विभागाच्या विशेष शाखेने आयपीएलच्या सहाव्या पर्वात फिक्सिंग प्रकरणातील आरोपपत्रामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसह ४२ व्यक्तींवर आरोप ठेवले होते. त्यात तीन क्रिकेटपटूंचा समावेश होता. दिल्ली पोलिसांनी १६ मे २०१३ रोजी मुंबईमध्ये छापा मारताना राजस्थान रॉयल्सच्या ३ क्रिकेटपटूंना अटक केली होती. न्यायालयात आरोप निश्चित करण्यास झालेल्या युक्तिवादामध्ये पोलिसांनी खेळाडू व सट्टेबाजांदरम्यान दूरध्वनीवर झालेल्या चर्चेचा हवाला दिला होता. बीसीसीआयने या तिघांवर आजीवन बंदी घालण्याचा निर्णय घेतला. पातियाळा हाउस न्यायालयात अतिरिक्त सत्र न्यायाधीश नीना बन्सल कृष्णा यांना या प्रकरणात गेल्या २९ जून रोजी आदेश पारित करायचा होता, पण त्या वेळी आदेशपत्र तयार नसल्यामुळे सुनावणी २५ जुलैपर्यंत स्थगित करण्यात आली होती.बंदी सुरू राहील - बीसीसीआयश्रीसंत, चंडीला व चव्हाण यांना न्यायालयाने पुराव्याअभावी दोषमुक्त केले तरी बीसीसीआय सध्यातरी त्यांच्यावरील बंदी कायम ठेवणार आहे. बीसीसीआयचा निर्णय शिस्तपालन कारवाईवर अवलंबून असल्याने सध्या बंदी कायम राहील, असे बीसीसीआयने म्हटले आहे. 36 जण निर्दोष मुक्त!न्यायालयाने या प्रकरणात ३६ आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. सर्व ३६ आरोपी जामिनावर आहेत. न्यायालयाच्या निर्णयामुळे दिल्ली पोलीस विभागाला मोठा धक्का बसला आहे. सुनावणीदरम्यान तिन्ही क्रिकेटपटूंचे समर्थक न्यायालयाच्या परिसरात उपस्थित होते. त्याचप्रमाणे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी न्यायालयाच्या परिसरात गर्दी केली होती. तिन्ही क्रिकेटपटू निर्दोष असल्याचा निर्णय झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. मला न्याय मिळेल हे मी मागच्या जूनमध्ये सांगितले होते. आता न्याय मिळाला. अनेक कठीण क्षणांचा सामना करावा लागला. लवकरच राष्ट्रीय संघात स्थान मिळेल, अशी आशा आहे.- श्रीसंतवाईट स्वप्नातून बाहेर आल्यासारखे वाटते. आयुष्यातील ती खराब वेळ होती. निर्णय लवकर यावा, असे मनोमन वाटायचे. मी देवाचे आभार मानतो. मला पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर परतायचे आहे.- अजित चंडीलाआता माझी क्रिकेट खेळण्याची शक्यता निश्चित वाढली आहे. पुढे काय होतंय ते कळेलंच. हा काळ अत्यंत खडतर होता. मित्रांनी व परिवाराने मला खूप आधार दिला. आता पुन्हा क्रिकेट खेळू शकेन.- अंकित चव्हाण
तिन्ही खेळाडू नॉट आउट!
By admin | Updated: July 26, 2015 04:07 IST