प्रशांत माने, कल्याणआपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा असे सल्ले केडीएमसी प्रशासन नागरीकांना देत असले तरी स्वत:च्या शाळांच्या भोवतालच्या परिस्थितीकडे त्यांचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. येथील पश्चिमेकडील मोहने-गाळेगाव परिसरातील पं. दिनदयाळ उपाध्याय शाळेच्या भोवताली सांडपाण्याने दलदल माजल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.हिंदी माध्यमाच्या या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. सद्यस्थितीला विद्यार्थी पटसंख्या १३५ इतकी आहे. याआधी ती १५१ च्या आसपास होती. परंतु, शाळेपासून अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर हिंदी माध्यमाची खाजगी शाळा आहे. त्याचा फटका या शाळेला बसल्याचे घटत्या पटसंख्येवरून दिसते. बालवाडीत १५ मुले असून अन्य इयत्ताचा आढावा घेता पहिलीत ९, दुसरीत १३, तिसरीमध्ये २२, चौथीत २४, पाचवीत २६, सहावीमध्ये १५ तर सातवीत २६ विद्यार्थी आहेत. याठिकाणी सहा शिक्षक कार्यरतआहेत. समुह साधन केंद्र असलेल्या या शाळेच्या अखत्यारीत प्राथमिक ९ तर माध्यमिक २ अशा ११ शाळा आहेत. १९७४ सालची शाळेची स्थापना आहे. परंतु, १९९४ मध्ये जिल्हा परिषदेकडून ताबा मिळाल्यानंतर केडीएमसी शिक्षण मंडळाने तिचे नुतनीकरण केले. सद्यस्थितीला छतावरील पत्र्यांमधून पाण्याची गळती लागल्याने याठिकाणी डागडुजीची आवश्यकता भासत आहे. शैक्षणिकसाहित्यांमध्ये गणवेश आणि बूट आजच्या घडीलाही मिळालेले नाहीत. दोन संगणक आहेत. परंतु,ते नादुरूस्त आहेत. शालेय पोषण आहार नियमितपणे मिळत आहे. तसेच मुलामुलींसाठी प्रसाधनगृहाची स्वतंत्र सुविधा आहे. दरम्यान शाळेच्या भोवतालची परिस्थिती चांगली नाही. परिसरात असलेल्या घरांचे सांडपाणी उघड्यावर सोडले जात असल्याने शाळेच्या समोरच दलदल माजली आहे. यातून विद्यार्थ्यांना शाळेची वाट धरावी लागत आहे. काही वेळेस पर्यायी रस्त्याचादेखील आधार घेतला जात आहे. महापालिकांच्या शाळांमध्ये सहसा गरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. एकंदरीतच ही परिस्थिती पाहता ‘गरीबाला कोणी वाली नाही’ असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
त्यांच्या शाळेची ‘वाट’ दलदलीची
By admin | Updated: September 30, 2015 00:03 IST