लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : सन २००० ते २०१७ अशा गेल्या १७ वर्षांच्या कालावधीत रायगड जिल्ह्यातील १८ वर्षांखालील एकूण ५६ बालके हरविलेली (मिसिंग) असून, ती अद्यापपर्यंत सापडलेली नाहीत. या सर्व बालकांना शोधून काढण्याकरिता संपूर्ण जुलै महिन्यात रायगड पोलिसांच्या माध्यमातून ‘आॅपरेशन मुस्कान-३’ ही शोधमोहीम हाती घेण्यात आली असल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी दिली आहे.या मोहिमेअंतर्गत राज्यातील इतर जिल्ह्यांसोबतच सर्व राज्यांच्या पोलिसांशी समन्वय साधून शोध घेण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या हरविलेल्या बालकांचा शोध लागला आहे त्या बालकांना त्यांच्या आईवडिलांपर्यंत पोहोचविले जाईल. ही मोहीम राबविताना जी मुले वा मुली निवारा, निवासस्थाने, रेल्वेस्थानके, बसस्थानके, रस्ते, धार्मिकस्थळे, हॉटेल, धाबे, कारखाने येथे काम करणारी बालके, भीक मागणारी बालके, कचरा गोळा करणारी बालके यांची या महिनाभराच्या कालावधीत पडताळणी करण्यात येणार आहे. पडताळणी दरम्यान बेवारस असल्याचे निदर्शनास आल्यास मुलांची नोंद घेऊन त्या मुलांचे फोटो व व्हिडीओग्राफी करून माहिती संकलित के ली जाईल. ही सर्व माहिती राज्य शासनाच्या संकेतस्थळावर व प्रसार मध्यमाद्वारे प्रसारित करण्यात येणार आहे. जनतेने सहकार्य करावे जिल्ह्यातील जनतेने या योजनेत सहकार्य केल्यास ही योजना चांगल्या पद्धतीने राबवून यशस्वी होऊ शकेल. आपल्या परिसरात बेवारस बालके आढळून आल्यास नागरिकांनी तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास अथवा रायगड जिल्हा आॅपरेशन मुस्कान मोहीम संपर्क क्र मांक (नियंत्रण कक्ष) ०२१४१-२२२१०० यावर संपर्क साधून माहिती कळवावी. जनतेने अशा बेवारस बालकांचा शोध घेऊन पोलिसांना मदत केल्यास, त्यांना मोहिमेअंती गौरविण्यात येणार आहे.
रायगड पोलिसांची ‘आॅपरेशन मुस्कान’ शोधमोहीम
By admin | Updated: July 7, 2017 06:33 IST