मुंबई : कोकण रेल्वेवरील सर्व खाद्यपदार्थाच्या स्टॉल्सवर कोकणी मेव्याला विक्रीसाठी प्राधान्य देण्याच्या सूचना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केल्या असून, त्याची त्वरित अंमलबजावणी करण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे पर्यटकांना कोकणी पदार्थाची चव स्थानकांवर चाखण्यास मिळणार आहे.
कोकण रेल्वेमार्गावरील स्थानकांवर खाद्यपदार्थाचे स्टॉल्स असून, त्यावर कोकणचे पदार्थ विक्रीसाठी ठेवले जात नाहीत. हे पाहून सुरेश प्रभू यांनी कोकण रेल्वेच्या स्टॉल्सवर कोकणी मेव्याला विक्रीसाठी प्रोत्साहन द्यावे, अशी सूचना केली. कोकणी मेव्याच्या नावे प्रसिद्ध असलेले काजू, कोकम सरबत, आंबा बर्फी, फणस बर्फी इत्यादींचा त्यात समावेश असेल. ते विक्रीसाठी ठेवावेत. त्याचप्रमाणो कोकम सरबतच्या स्टॉलला सर्वाधिक प्राधान्य देण्यात यावे, असाही सल्ला त्यांनी रेल्वे अधिका:यांना दिला आहे.
विशेष स्टॉलसाठी योजना आखा
महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ व विशेषत्वाने कोकणी खाद्यपदार्थासाठी कोकण
रेल्वेने मुख्य स्थानकांवर विशेष स्टॉल आणि हॉटेलची योजना आखावी, असे निर्देशही देण्यात आल्याचे सांगण्यात आले. याबाबत मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी सांगितले की, रेल्वेमंत्र्यांच्या निर्देशानुसार त्यासाठी योजना आखत आहे. तसेच रत्नागिरी स्थानकावर विशेष खानपान स्टॉल आणि हॉटेलच्या योजनेचा प्रस्तावही आहे.