मुंबई : गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा विचार करता स्वाइन फ्लूचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे भित्तीपत्रके, प्रदर्शने आयोजित करून जनजागृती करणार आहेत. सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी ही माहिती दिली. स्वाइन फ्लूचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी रविवारी दुपारी कस्तूरबा रुग्णालयात एक बैठक घेतली. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालये संचालिका डॉ. सुहासिनी नागदा, सहआरोग्य अधिकारी डॉ. नाईक, उप आरोग्य अधिकारी डॉ. मिनी खेत्रपाल, साहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. शीला जगताप, कस्तूरबा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार हे उपस्थित होते. यावेळी डॉ. सावंत यांनी सांगितले, की स्वाइन फ्लूचे रुग्ण राज्यात वाढत आहेत. हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. हे टाळण्यासाठी सरकारच्या बरोबरीनेच लोकसहभागही अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणूनच आम्ही सार्वजनिक मंडळांबरोबर बैठका घेऊन जनजागृती करण्याची विनंती त्यांना केली आहे. स्वाइन फ्लू आणि स्वाइनसदृश आजाराने होणारे मृत्यू यांतील फरक स्पष्ट करणारे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी शहानिशा करणारे मृत्यू परीक्षण अहवाल आरोग्य यंत्रणांनी बनवावेत. स्वाइन फ्लू बाधा झाल्याचे प्रयोगशाळांतून जास्त प्रमाणात अहवाल येत असल्यास औषधोपचार सुरू करण्यासोबतच पुन्हा त्या रुग्णांची सरकारी रुग्णालयांत तपासणी करून खातरजमा करावी, असे आदेश त्यांनी दिले. यासंदर्भात स्थानिक वैद्यकीय संघटनांबरोबर परत बैठका आयोजित करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
बाप्पाच्या उत्सवातून आरोग्याचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2015 04:22 IST