नवी मुंबई : डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याच्या बहाण्याने फसवणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. व्यवस्थापनाचा एक कर्मचारी आणि इतर दोघांच्या माध्यमातून हे रॅकेट चालवले जात असे. चेंबूरचे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक कुलदीप पेडणेकर यांच्या तक्रारीनुसार गुन्हे शाखा पोलिसांनी हे रॅकेट उघड केले आहे. अभिजीत शेळके (३५), स्नेहल पवार (२८) आणि जयंत पवार (३०) अशी अटक केलेल्यांची नावे असल्याचे गुन्हे शाखा उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले. त्यांना २० फेब्रुवारीपर्यंतची पोलीस कोठडी ठोठावली आहे.पेडणेकर यांच्या मुलीला डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश हवा होता. यासाठी त्यांनी एप्रिल २०१४मध्ये व्यवस्थापनाच्या संबंधित व्यक्तींशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांना अभिजीत शेळकेला भेटण्यास सांगण्यात आले. ते शेळके याच्या कार्यालयाजवळ गेले असता तेथे स्नेहल पवार भेटला. त्याने स्वत:च अभिजीत असल्याचे सांगून प्रवेशाची बोलणी करून ६२ लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार पेडणेकर यांनी ५ लाख रुपये रोख, ९ लाख ५० हजारांचा धनादेश व ४८ लाख रुपये टप्प्याटप्प्याने पवार याच्याकडे दिले. मात्र त्यानंतरही मुलीला महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याने त्यांनी अभिजीत शेळके याच्याशी पुन्हा संपर्क साधला. यावेळी अभिजीत शेळके नावाने पूर्वी भेटलेली व्यक्ती स्नेहल पवार असल्याचे समजले. तसेच खऱ्या अभिजीतने आपण स्नेहल पवार याला ओळखत नसल्याचेही सांगितले. परंतु संपूर्ण प्रकार महाविद्यालयाच्या आवारातच झाला होता. त्यामुळे फसवणूकप्रकरणी पेडणेकर यांनी पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार उपआयुक्त सुरेश मेंगडे, उपआयुक्त शहाजी उमाप, सहाय्यक आयुक्त रणजीत धुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे, सहाय्यक निरीक्षक कृष्णा कोकणी यांच्या पथकाने महाविद्यालयत आठ दिवस पाळत ठेवली. रॅकेटची माहिती मिळताच तिघांनाही अटक केल्याचे उपआयुक्त मेंगडे यांनी सांगितले. शेळके हा डी. वाय. पाटील व्यवस्थापनाचा कर्मचारी असल्याने रॅकेटमध्ये वरिष्ठांचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. तर स्नेहल व जयंत यांचा डी. वाय. पाटील समूहाशी प्रत्यक्ष संबंध नाही. मात्र स्नेहलचा अभिजीतच्या कार्यालयात थेट वावर असल्याने या रॅकेटमधे त्याचाही सहभाग असल्याचे मेंगडे यांनी सांगितले. जादा रकमेत अॅडमिशन विकले?पेडणेकर यांच्याकडून ६२ लाख रुपये घेतल्यानंतर त्यांच्या मुलीला वैद्यकीय शाखेत प्रवेश दिला जाणार होता. मात्र त्याच वेळी दुसऱ्या व्यक्तीला ७२ लाख रुपयांना हे अॅडमिशन विकले गेल्याचे समजते. त्यामुळेच ऐनवेळी पेडणेकर यांच्या मुलीला प्रवेश नाकारण्यात आल्याचे समजते. याचा उलगडा झाल्यास हा बाजार उघडकीस येण्याची शक्यता आहे.सांगली येथून अटक केलेला जयंत पवार हा स्नेहल पवारचा चुलतभाऊ आहे. स्नेहल अॅडमिशनद्वारे मिळवलेली रक्कम ठेवण्यासाठी जयंतकडे द्यायचा. त्यानुसार जयंत याला सांगली येथील कुंडल गावामधून अटक केल्याचे पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांनी सांगितले.पेडणेकर यांनी प्रवेशासाठी स्नेहल पवारशी व्यवहार केलेला आहे. मात्र स्नेहल याचा अभिजीत व डी. वाय. पाटील व्यवस्थापन यांच्याशी संबंध नाही. त्यामुळे या प्रकरणात अभिजीत यांचा सहभाग नसून ते निर्दोष आहेत. काही खासगी व्यक्ती प्रवेशाचे रॅकेट चालवत असल्याची माहिती यापूर्वीच मिळालेली. त्यांची छायचित्रे महाविद्यालय आवारात लावून त्यांच्याशी अॅडमिशन संदर्भात संपर्क साधू नये असे आवाहनही करण्यात आलेले आहे. - डॉ. श्याम मोरे, डी. वाय. पाटील
वैद्यकीय प्रवेशासाठी ६२ लाखांची फसवणूक
By admin | Updated: February 17, 2015 01:55 IST