नवी दिल्ली : तेलंगण राष्ट्र समिती व बीजदच्या सदस्यांनी पोलावरम सिंचन प्रकल्पाचा मुद्दा लोकसभेत आज उपस्थित करून त्यासंदर्भातील वटहुकमाला आपला विरोध दर्शविला.
नवनियुक्त सदस्यांच्या शपथविधीनंतर अध्यक्ष सुमित्र महाजन यांनी सभागृहाचे कामकाज सुरू करताच टीआरएसच्या सदस्यांनी हाती फलक घेऊन त्यांच्या आसनासमोर गर्दी केली. यावेळी बीजदचे सदस्य भृतुहरी मेहताब यांनीही आपल्या स्थानावरून उभे राहून वटहुकमाबाबत मुद्दा उपस्थित केला. बीजद व टीआरएस सदस्यांनी, आदिवासीविरोधी पोलावरमला बंद करावे व वटहुकूम परत घ्यावा, अशा आशयाचे फलक हाती धरले होते. अध्यक्षांनी सदस्यांना अशा पद्धतीने फलक दाखवू नये व आपल्या जागेवर बसण्यास सांगितले. हा वटहुकूम जेव्हा सदनात चर्चेकरिता सादर होईल तेव्हा सदस्यांनी आपली मते मांडावीत, असेही अध्यक्ष महाजन यांनी म्हटले.
या गोंधळात संसदीय कार्य राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी सदनात आंध्र प्रदेश पुनर्गठनाच्या दुरुस्तीविषयीच्या वटहुकमाची प्रत सादर केली. अध्यक्ष सुमित्र महाजन यांनी या गोंधळानंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)