RSS Mohan Bhagwat On Ram Mandir: राम मंदिर प्रतिष्ठापणेनंतरच देशात खऱ्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवली गेल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. अयोध्येतील प्रभू रामाच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख 'प्रतिष्ठा द्वादशी' म्हणून साजरी केली जावी कारण हे मंदिर अनेक शतकांपासून शत्रूच्या हल्ल्याचा सामना करत आणि भारताच्या खऱ्या स्वातंत्र्याची स्थापना या दिवशी झाली, असं मोहन भागवत म्हणाले. राममंदिर आंदोलन कोणाचाही विरोध करण्यासाठी सुरू केलेला नसल्याचेही मोहन भागवत म्हणाले.
गेल्या वर्षी २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा आयोजित केली होती. मात्र, हिंदू कॅलेंडरनुसार, त्याची तारीख ११ जानेवारी २०२५ होती. इंदौर येथील श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांना 'राष्ट्रीय देवी अहिल्या पुरस्कार' प्रदान केल्यानंतर एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी हे विधान केलं.
"राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा हे भारताचे खरे स्वातंत्र्य आहे. हा दिवस पौष शुक्ल द्वादशी म्हणून साजरा केला पाहिजे, जो शतकानुशतके बाह्य आक्रमणाने सहन करणाऱ्या भारताच्या खऱ्या स्वातंत्र्याची स्थापना याच दिवशी झाली," असं मोहन भागवत म्हणाले.
"देश स्वतःच्या पायावर उभा राहावा आणि जगाला रस्ता दाखवता यावा यासाठी भारताने स्वतःला जागृत करण्यासाठी राम मंदिर आंदोलन सुरू केले होते. कोणाचा विरोध करण्यासाठी राम मंदिर आंदोलनाची सुरुवात केलेली नाही," असंही मोहन भागवत यांनी यावेळी म्हटलं. गेल्या वर्षी अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेवेळी देशात कोणताही वाद झाला नाही, असेही भागवत म्हणाले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर राय यांनी हा पुरस्कार राम मंदिर आंदोलनात सहभागी असलेल्या लोकांना समर्पित केला. "हा पुरस्कार मी राम मंदिर आंदोलनात सहभागी असलेल्या ज्ञात-अज्ञात लोकांना समर्पित करतो, ज्यांनी अयोध्येत हे मंदिर बांधण्यात मदत केली. अयोध्येत बांधलेले हे मंदिर हिंदुस्थानच्या अभिमानाचे प्रतीक आहे आणि तेच या मंदिराच्या उभारणीचे कारण आहे," असं चंपत राय यांनी म्हटलं. दरम्यान, राष्ट्रीय देवी अहिल्या पुरस्कार हा एक प्रतिष्ठित पुरस्कार आहे जो श्री अहिल्योत्सव समिती या इंदौर इथल्या सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. माजी लोकसभा अध्यक्षा आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन या संघटनेच्या अध्यक्षा आहेत. हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांमध्ये नानाजी देशमुख, विजया राजे सिंधिया, रघुनाथ अनंत माशेलकर आणि सुधा मूर्ती या दिग्गजांचा समावेश आहे.