नाशिक : वाढीव महागाई भत्ता, वेतन करारातील थकबाकी यांसह विविध मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या वतीने परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने करण्यात आली.आगाराचे सचिव स्वप्नील गडकरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या निदर्शने आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांना देण्यात आले. सदरच्या निवेदनानुसार, वेतन करारातील ५५० कोटींची थकबाकी रक्कम तत्काळ देणे, जानेवारीपासूनचा वाढीव दहा टक्के महागाई भत्ता लागू करावा, शासनाकडून महामंडळास देय असलेले १८४० कोटी रुपयांची रक्कम रोखीने द्यावी अन्य राज्यांप्रमाणेच एसटीला पथकरातून (टोलनाका) वगळण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या वतीने राज्यभर निदर्शने आंदोलने करण्यात येऊन मुख्यमंत्री चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, येत्या ४ जून रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर एकदिवसीय धरणे आंदोलन केले जाणार आहे. सदरच्या आंदोलनामध्ये सुरेश पेनमहाले, शिवाजीराव ढोबळे, शरद कोल्हे, अभिजित हामंत, प्रवीण सपकाळे, उद्धव पगारे आदिंसह एस. टी. कामगार संघटनेचे पदाधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.
विविध मागण्यांबाबत एसटी कामगारांचे आंदोलन
By admin | Updated: May 28, 2014 01:34 IST