नवी दिल्ली : एरवी फायदेशीर ठरणाऱ्या डाळींच्या उत्पादनात अपुरा पाऊस, पिकांवर होणारा रोगांचा प्रादुर्भाव अशा विविध कारणांमुळे घट झाली आहे; मात्र केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीय खाद्य सुरक्षा मिशनखाली डाळींचे उत्पादन वाढवण्याची योजना राबवण्यात येत आहे.कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री मोहनभाई कुंडारिया यांनी राज्यसभेमध्ये ही माहिती दिली. खासदार विजय दर्डा यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, देशाच्या मागणीच्या तुलनेत डाळींचे उत्पादन कमीच होत असते. त्यामुळे देशाला डाळी आयात कराव्या लागतात. सन २०१४-१५ मध्ये २१० टन डाळींची मागणी असताना उत्पादन १७१.५ टन इतकेच झाले होते.त्यामुळे डाळींचे उत्पादन वाढवण्यासाठी विविध प्रयत्न सुरू असून, राष्ट्रीय खाद्य सुरक्षा मिशनअंतर्गत राज्यांतील ६२२ जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू आहे. याशिवाय भारतीय कृषी संशोधन परिषदेने उत्पादनवाढीसाठी काही प्रयोग सुरू केले आहेत. डाळींचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी किमान आधारभूत दरातही वाढ करण्यात आली आहे, असे राज्यमंत्री म्हणाले.(लोकमत न्यूज नेटवर्क)
डाळींचे उत्पादन वाढवण्यासाठी विशेष योजना
By admin | Updated: March 2, 2016 02:31 IST